कोरोना लसीसाठी लागणार महाकाय शीतगृहे

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

सर्वांत आघाडीवर असलेल्या फायझर आणि बायोएनटेक्‍स कंपनी निर्मित कोरोना लशींच्या वितरणासाठी महाकाय शीतगृहांची आवश्‍यकता भासणार आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांसह गरीब देशांसमोर अशी व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

पुणे :  सर्वांत आघाडीवर असलेल्या फायझर आणि बायोएनटेक्‍स कंपनी निर्मित कोरोना लशींच्या वितरणासाठी महाकाय शीतगृहांची आवश्‍यकता भासणार आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांसह गरीब देशांसमोर अशी व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अमेरिकेत मिशिगनमध्ये आणि बेल्जियममध्ये फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची व्यवस्था उभारण्यात आली असून, त्यात शेकडो शीतगृहे उभारण्यात आल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे. अमेरिकेची फायझर आणि जर्मनीची बायोएनटेक कंपनीच्या या लशीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. त्या पार्श्‍वभूमीवर तेथील सरकारांनी वितरणासाठी महाकाय व्यवस्थांची निर्मिती केली आहे.

"युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये ४० हजार शीतगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने आफ्रिकेतील देशांमध्ये ही शीतगृहे उभारण्यात येणार असून, त्याचबरोबर कोट्यवधी वैद्यकीय सुयांचा पुरवठाही करण्यात येणार आहे."
- जान गांधी, 
प्रमुख, युनिसेफ पुरवठा विभाग.  

शुष्क बर्फातून होणार वाहतूक
लशींच्या वाहतुकीसाठी फायझर कंपनीच्या वतीने बर्फ रूपातील कार्बन डायऑक्‍साईडचा (ड्राय आईस किंवा शुष्क बर्फ) वापर करण्यात येत आहे. सुटकेसच्या आकाराच्या बॉक्‍समध्ये एक ते पाच हजार लसींचे डोस पाठविण्यात येतात. जास्तीत जास्त १० दिवसांपर्यंत हे तापमान टिकून राहते. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानातही पाच दिवस या लशी टिकू शकतात, असे फायझर कंपनीने स्पष्ट केले आहे. 

पुढील वर्षी १.३ अब्ज डोस
संबंधित लशीचे १० कोटी डोस अमेरिकेला रवाना करण्यात येणार आहेत. तर, युरोपसाठी २० कोटी आणि ब्रिटनसाठी चार कोटी डोस पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर आफ्रिकी आणि आशियाई देशांनीही लशीसाठी मागणी नोंदविल्याचे फायझरच्या वतीने सांगण्यात आले आहे. जागतिक स्तरावर पाच कोटी यावर्षी वितरित करण्यात येणार असून, पुढील वर्षी १.३ कोटी लशींची निर्मिती करण्याचा फायझरचा मानस आहे. 
 

 

संबंधित बातम्या