उत्तर भारतात थंडीची लाट ; काश्‍मीरमध्ये उणे तापमान

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागात ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली :  उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागात ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. २ ते ६ जानेवारीदरम्यान पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्‍मीरमध्ये बहुतांश ठिकाणचे तापमान उणे अंशांखाली गेल्याने काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे. 

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला हा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात हरियानात सर्वात कमी शून्य ते १.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यात नव्या वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत झाले. खोऱ्यात अनेक ठिकाणी किमान तापमान उणे अंशांखाली नोंदले गेले. पर्यटकांचे आकर्षण असलेले गुलमर्ग येथे गुरुवारी रात्री उणे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पाइपलाइनमधील पाणी गोठल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. 

श्रीनगर येथे उणे ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी तेथे उणे ५.९ अंश तापमानाची नोंद झाली होती. पहेलगाम येथेही उणे ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. काझीगुंद, कुपवाडा, कोकेनरर्ग येथेही उणे तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात तापमानात फारसा फरक पडणार नाही आणि वातावरण कोरडे राहील, असे वेधशाळेने सांगितले. काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविली आहे.

संबंधित बातम्या