कर्नाटकात सुरू झालेली महाविद्यालये पुन्हा बंद होण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

राज्यात पदवी आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर सहाच दिवसांत १३० विद्यार्थी व काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे अशीच पुढे येत राहिल्यास महाविद्यालये पुन्हा बंद करावीच लागतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

बंगळूर :  राज्यात पदवी आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर सहाच दिवसांत १३० विद्यार्थी व काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे अशीच पुढे येत राहिल्यास महाविद्यालये पुन्हा बंद करावीच लागतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. ते धारवाड येथे पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री डॉ. सुधाकर यांनी विद्यार्थ्यांमधील वाढत्या कोरोना संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली. सोमवारी (ता. २३) कर्नाटक सरकार शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. त्यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी महाविद्यालयांबाबत विधान करुन शाळा सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याचे संकेत दिले. कोरोनाच्या भीतीने राज्यात अद्यापही शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यामागील कारण स्पष्ट करताना मंत्री डॉ. सुधाकर यांनी, विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होत नाही असा आम्ही दावा करणार नाही; मात्र तरुणांमध्ये अधिक रोगप्रतिकारशक्ती असते. आम्हाला विद्यार्थ्यांचे जीवन वाचवणे तसेच त्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे आवश्‍यक आहे. आमच्यावर मोठी जबाबदारी असल्याने आम्ही महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गॅझेट्‌सचा अभाव, कनेक्‍टिव्हिटी खराब असणे आणि दृष्टिदोषासारख्या आरोग्याच्या समस्या अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठाचे योग्य प्रकारे आकलन होत नाही. याखेरीज प्राध्यापक आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना बेरोजगारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अधिक वाचा : 

पंतप्रधान मोदींचा भारतातील कार्बन फूट प्रिंटचे प्रमाण कमी करून पॅरिस कराराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस

मसुरीतील ३९ ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण 

संबंधित बातम्या