दिल्लीतील कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी धावाधाव

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र-एनसीआर व महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांत दिवाळीनंतर कोरोना संसर्गात पुन्हा वाढ झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेली पथके पुन्हा एकदा राज्याराज्यांत पाठवून रोजच्या रोज आढावा घेण्याचे ठरविले आहे.

नवी दिल्ली :  दिल्ली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र-एनसीआर व महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांत दिवाळीनंतर कोरोना संसर्गात पुन्हा वाढ झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेली पथके पुन्हा एकदा राज्याराज्यांत पाठवून रोजच्या रोज आढावा घेण्याचे ठरविले आहे. मुंबई व महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत केंद्रीय पथक रवाना होणार आहे. हरियाना, मणिपूर, गुजरात व राजस्थानमध्ये पथके रवाना झाल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. 

चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्याची सूचना केंद्राने केली आहे. यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांची ओळख पहिल्याच टप्प्यात होऊन प्राणहानी टाळण्यास मोठी मदत होईल. कोरोनाचे संक्रमण होऊनही रूग्ण समोर न येण्याच्या घटना वाढल्याने दिल्ली व अनेक ठिकाणची परिस्थिती पुन्हा गंभीर बनल्याचे आरोग्य मंत्रालयाचे निरीक्षण आहे. दरम्यान, कोरोनाची पुन्हा लाट आल्याने दिल्ली-मुंबई विमान व रेल्वेसेवा पुन्हा तत्काळ बंद करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र रेल्वेकडे त्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले. 

पथकांकडील जबाबदाऱ्या

राज्यांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या आरोग्य पथकांकडे मुख्यतः त्या त्या राज्यातील आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करणे, महामारीचा जास्त फैलाव असलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणे, संक्रमणाचा वेग रोखून चाचण्या, उपचार याबाबत स्थानिक यंत्रणांना सक्रिय मदत करणे, केंद्राला परिस्थितीची वेळोवेळी माहिती कळविणे यासारख्या जबाबदाऱ्या असतील. 

थुंकल्यास दोन हजारांचा दंड

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने दिल्ली प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी साथरोग व्यवस्थापन कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामुळे आता नागरिकांनी मास्क न वापरल्यास किंवा सामाजिक अंतर न पाळल्यास दोन हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच, पान, गुटखा खाऊन रस्त्यात थुंकणेही महागात पडणार असून असे करणाऱ्यालाही दोन हजार रुपये दंड ठोठावण्याचा अधिकार प्रशासनाला प्राप्त झाला आहे.  राज्यात संसर्ग वाढत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर झाले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. बाजारपेठा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केजरीवाल यांनी त्यांना सांगितले. मात्र, कोरोना नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्‍यक असल्याचेही केजरीवाल यांनी त्यांना सांगितले. बाजारात कोणीही विनामास्क फिरताना आढळल्यास त्याला मोफत मास्क पुरविण्यास आणि दुकानांमध्ये अतिरिक्त मास्क आणि सॅनिटायझर ठेवण्यास दुकानदारांना सांगण्यात आले आहे. संसर्ग रोखतानाच अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बाजारपेठांचीच मोलाची मदत होणार आहे, असे केजरीवाल म्हणाले. 

अधिक वाचा : 

पंतप्रधान मोदींचे पुन्हा जय जवान

 

 

संबंधित बातम्या