काँग्रेसचे आमदार जैसलमरला रवाना

PTI
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पक्षाकडून विशेष विमानांची सोय
राजस्थानात घोडेबाजार तेजीत

जयपूर

राजस्थानातील सरकार सुरक्षित राहावे म्हणून काँग्रेस नेतृत्वाकडून तारेवरच्या कसरती सुरूच आहे. येथील जयपूर-दिल्ली महामार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलामध्ये मुक्कामास असलेल्या काँग्रेसच्या ५० आमदारांना आज विशेष विमानातून जैसलमर येथे हालविण्यात आले. या आमदारांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी तीन चार्टर्ड विमाने सज्ज ठेवण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केवळ वातावरणामध्ये बदल व्हावा म्हणून आम्ही जैसलमेर येथे जात आहोत, असे काँग्रेसचे आमदार प्रशांत बैरवा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असले तरीसुध्दा यामागचा त्यांचा उद्देश लपून राहिलेला नाही. या सर्व आमदारांचा पंधरा दिवस मुक्काम तिथेच असेल, मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील जैसलमेरला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यामध्ये घोडेबाजाराला ऊत आला असून आमदारांना फोडण्यासाठी आता काही कोटींची बोली लावली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी चौदा ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याची परवानगी दिली असून गेहलोत सरकारने त्यांच्यावर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आपले आमदार फुटू नये म्हणून आत्तापासून तटबंदी मजबूत करायला सुरवात केली आहे.

ज्या बंडखोर आमदारांनी अद्याप पैसे स्वीकारलेले नाहीत अशी मंडळी पुन्हा पक्षामध्ये येऊ शकतात, त्यांच्यासाठी काँग्रेसची दारे खुली सदैव खुली आहेत. बंडखोर आमदारांसाठी आता अमर्याद बोली लावली जाऊ लागली आहे. सध्या घोडेबाजार तेजीमध्ये आहे.
- अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

सचिन पायलट यांच्यासाठी आज देखील काँग्रेसची दारे खुली आहेत, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ते परत पक्षामध्ये येऊ शकतात.
-बद्रीराम जाखड, माजी खासदार

पक्षप्रतोद जोशी सर्वोच्च न्यायालयात
राजस्थान उच्च न्यायालयाने पायलट गट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना दिलेल्या दिलाशाच्या विरोधात काँग्रेसचे मुख्य पक्षप्रतोद महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा करत जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज याचिका सादर केली आहे.

संपादन- अवित बगळे
 

संबंधित बातम्या