जनतेच्या हितासाठी काँग्रेसने दिलेला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव नाकारला: ज्योतिरादित्य शिंदें

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

कॉंग्रेसचे सरकार मध्यप्रदेशमध्ये फार काळ चालणार नाही, असे मला वाटत होते. सरकारमध्ये मतभेद उफाळून येतील याचा मला अंदाज होता आणि तसेच घडले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडली. 

ग्वाल्हेर: दिल्लीतील नेत्यांनी २०१८ मध्ये माझ्यासमोर उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु तो प्रस्ताव जनतेच्या हितासाठी नाकारला, असा दावा कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. कमलनाथ यांचे सरकार १५ महिन्यातच कोसळले. कॉंग्रेसचे सरकार मध्यप्रदेशमध्ये फार काळ चालणार नाही, असे मला वाटत होते. सरकारमध्ये मतभेद उफाळून येतील याचा मला अंदाज होता आणि तसेच घडले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडली. 

भाजपच्या तीन दिवसीय सदस्य नोंदणी अभियानातंर्गत रविवारी दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. परंतु ते पद स्वीकारण्याऐवजी जनतेचे सेवा करण्याचे ठरवले. विधानसभेत निवडून आल्यानंतर कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले. पण कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यामुळे काँग्रेस सरकारमध्ये मतभेद निर्माण होतील असे वाटत होते आणि तसेच घडले. कॉंग्रेसने जनतेला दिलेली आश्‍वासनं पाळली नाहीत. काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तर दहा दिवसात शेतकऱ्यांच्या दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. जर कर्ज माफ झाले नाही तर ११ व्या दिवशी मुख्यमंत्री बदलला जाईल, असे जाहीर केले गेले. पण कर्ज माफ झालेच नाही. कॉंग्रेस सरकारला मजबूत करण्यासाठी आणि विकासासाठी ग्वाल्हेर आणि चंबळ विभागातून २६ आमदार निवडून दिले. परंतु विकासाऐवजी भ्रष्टाचार सुरू झाला. 

मी आजोबा आणि वडिलांप्रमाणेच जनतेचा सेवक आहे. मी खुर्चीचा सेवक नाही. जर मला खुर्ची प्यारी असली असती तर उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मान्य केला असता, असा दावा त्यांनी केला.  

दिग्विजय सिंह यांचे मार्च महिन्यातील वक्तव्य
यादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मार्च महिन्यांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे म्हटले होते. परंतु शिंदे हे आपल्या चेल्यास उपमुख्यमंत्री करु इच्छित होते. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिंदेंच्या चेल्याचे नाव नाकारले. 

सत्तेत असणारे लोक राज्याचे काय भले करणार हे मला चांगले ठाउक होते. त्यांचे पाप मला डोक्यावर घ्यायचे नव्हते. कमलनाथ मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य जनतेला स्थान राहिले नव्हते. मंत्री आणि आमदारांसाठीही मुख्यमंत्र्यांकडे वेळ नव्हता. काँग्रेसने वल्लभ भवनला भ्रष्टाचाराचा अड्डा केला होता. - ज्योतिरादित्य शिंदे, खासदार, भाजप

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या