राहुल गांधींनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंदांची भेट; कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.

नवी दिल्ली :  दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम असून देशात लोकशाही उरलेली नाही, सरकारला विरोध करणाऱ्यांना दहशतवादी ठरविले जात आहे, असा घणाघाती प्रहार त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.

अलीकडेच राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, सीताराम येचुरी, डी. राजा आणि टीकेएस एलन्गोवन (द्रमुक) या विरोधी पक्ष नेत्यांसोबत राष्ट्रपतींना भेटून कृषी कायद्यांबाबत हस्तक्षेपाची मागणी केली होती. मात्र, विरोधी पक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमात राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांचा समावेश नसल्यामुळे कॉँग्रेसमधील असंतुष्ट २३ पत्रलेखक नेत्यांनी  नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीची आज राहुल गांधींनी आझाद, लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांच्या समवेत राष्ट्रपतींची भेट घेऊन भरपाई केली. 

प्रियांका यांची टीका

पोलिसांच्या कारवाईने भडकलेल्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील सरकारविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला दहशतवादी ठरविले जात असा आरोप त्‍यांनी केला. राहुल गांधी यांच्या आजच्या राष्ट्रपती भेटीनंतर अकरा विरोधी पक्षांचे कृषी कायद्यांविरोधातील संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. शेतकरी विरोधातील कृषी कायदे तातडीने रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले जावे, अशी  एकत्रित मागणी या संयुक्त निवेदनात केली आहे.

 

 

संबंधित बातम्या