काँग्रेस नव्या जोमाने लढणार..

काँग्रेस नव्या जोमाने लढणार..
Congress President Sonia Gandhi has appointed three committees under the leadership of former P M Manmohan Singh

नवी दिल्ली :  राजकीय पिछेहाट होणाऱ्या काँग्रेसच्या संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि आर्थिक धोरणाला दिशा देण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन समित्यांची नियुक्ती केली. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका योग्यपद्धतीने मांडली जात नाही आणि त्यासाठी अनुभवी नेत्यांची मते विचारातही घेतली जात नसल्याचा आक्षेप होता.

काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर पत्र लिहून सवाल उपस्थित करणाऱ्या २३ नेत्यांच्या जी-२३ गटातील गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र या गटातले मनीष तिवारी, बिहार निवडणुकीच्या निकालानंतर नव्या वादाला तोंड फोडणारे कपिल सिब्बल यांना मात्र दूर ठेवण्यात आले आहे.  

संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या समित्यांची घोषणा केली. आर्थिक व्यवहार समितीमध्ये डॉ.  मनमोहनसिंह यांच्यासोबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे,विरप्पा मोईली, दिग्विजयसिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. तर जयराम रमेश या समितीचे समन्वयक असतील. परराष्ट्र व्यवहार विषयक समितीचे समन्वयक माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद असतील. या समितीत आनंद शर्मा, शशी थरूर आणि सप्तगिरी उलका यांना स्थान देण्यात आले आहे. 
दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा विषयक समितीचे समन्वयक म्हणून विन्सेन्ट एच. पाला यांना नेमण्यात आले आहे. या समितीमध्येही डॉ. मनमोहन यांच्या व्यतिरिक्त राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, व्ही. वैथीलिंगम यांचा समावेश आहे. 

यातील शशी थरूर यांनी तर, राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायचे नसेल तर नव्या अध्यक्षांची लवकर नियुक्ती करून निर्नायकी अवस्था संपवावी असा पक्षाला सल्ला दिला होता. तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे देखील उघडपणे पराभवाच्या कारणांच्या विश्लेषणासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनाही समित्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. तर महत्त्वाच्या समित्यांमध्ये संघटना सरचिटणीस आणि माध्यम विभाग  प्रमुखांना स्थान देण्याची प्रथा यावेळी बाजूला ठेवण्यात आली आहे. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि माध्यम विभाग प्रमुख व सरचिटणीस रणदीप सुरजेवाला या दोघांना समित्यांमध्ये न झालेला समावेश पक्षात  चर्चेचा विषय ठरला आहे. 

अधिक वाचा : 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com