कोरोनाने बदल करण्याची संधी दिली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अर्थव्यवस्थेसंदर्भात महंमद युनूस यांच्याशी राहुल गांधी यांची चर्चा

नवी दिल्ली

कोरोनाने आर्थिक चक्र उलटे फिरवले आहे. सारे पूर्वीसारखे व्हावे, असे लोकांना वाटते आहे. पण तसे झाले तर सर्वाधिक वाईट होईल. वैश्विक तापमान वाढीसह अनेक संकटे असलेल्या जगाकडे परत जाण्याची गरज काय, असा इशारा नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ व बांगलादेश ग्रामीण बॅंकेचे संस्थापक महंमद युनुस यांनी दिला आहे. कोरोनाने बदल करण्याची संधी दिली असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोरोना संकटाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला होता. या मालिकेत आज अर्थतज्ज्ञ आणि बांगलादेश ग्रामीण बॅंकेचे संस्थापक महंमद युनुस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटाचा सर्वसामान्यांना कशा प्रकारे आर्थिक फटका बसला आहे, याबाबतचे त्यांचे मत जाणून घेतले.
ग्रामीण बॅंकेच्या प्रयोगाचा प्रवास महंमद युनूस यांच्याकडून जाणून घेताना राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपला नाव न घेता लक्ष्य केले. उत्तर प्रदेशात महिलांच्या आर्थिक मदतीसाठी संस्था सुरू केली. परंतु राजकारणामुळे एका सरकारने ती मोडकळीस आणल्याचा आरोप करताना, अशा वातावरणात कसे काम करावे असा सल्लाही राहुल गांधींनी विचारला. तर, देशात सध्या बरेच काही चुकीचे घडत आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढलेली दरी लोकांना त्रास देते आहे. तरुणाईला नवे काही तरी करायचे आहे. विरोधी पक्ष या नात्याने यावर काम सुरू असल्याचा दावाही राहुल गांधींनी या चर्चेदरम्यान केला.
कोरोना संकटाने सामाजिक कुप्रथा समोर आणल्याचे सांगताना महंमद युनूस म्हणाले, की स्थलांतरीत मजुर आपल्यातलेच आहेत. त्यांना कोरोना संकटाने सर्वांसमोर आणले. ते अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा हिस्सा असल्याचे मानले जाते. त्यांना मदत केली तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची प्रगती साधता येऊ शकते. पण प्रत्यक्षात असे होताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पाश्‍चात्यांचे अनुकरण
भारत, बांगलादेश सारख्या देशांमध्ये आर्थिक घडामोडींमध्ये पाश्चात्यांचे अनुकरण होताना दिसते, असे निरीक्षण नोंदविताना महंमद युनूस यांनी स्थलांतरावर सवाल उपस्थित केला. मजूर, लहान व्यावसायिकांकडे गुणवत्ता असते. पण सरकार त्यांना अर्थव्यवस्थेचा हिस्सा मानत नाही. पाश्चात्य देशांमध्ये गावातील लोक शहरांमध्ये नोकरीसाठी स्थलांतर करतात. हेच भारतातही होत आले आहे. आजच्या इतके पूर्वी तंत्रज्ञान नव्हते, त्यामुळे स्थलांतर होत होते. परंतु तंत्रज्ञान असतानाही ग्रामीण भागातून शहरांमध्ये लोकांना का पाठवले जाते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या