महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक
Corona test is mandatory for travel from Maharashtra to Karnataka

बेळगाव : महाराष्ट्र व केरळमधील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येची दखल कर्नाटक राज्य सरकारने घेतली आहे. या राज्यांमधून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोविडची चाचणी सक्तीची केली आहे. कर्नाटकात प्रवेश करताना 72 तासांपूर्वी केलेली आरटी-पीसीआर चाचणीचे (निगेटिव्ह) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शनिवारी आरोग्य खात्याने बजावले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही याची कार्यवाही आजपासून सुरू करण्यात येणार आहे.कोणतीही निवासी शाळा, निवासीगृहे आणि शाळांमध्ये 5 हून अधिक जणांमध्ये कोविड-19 चे रूग्ण आढळून आल्यास स्थानिक आरोग्य प्राधिकारच्यावतीने सदर परिसर "कन्टेन्मेंट झोन'' म्हणून घोषित करावे, अशी सूचनाही राज्य सरकारच्या सचिवालयांनी केली आहे. कोविड-19 राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार हे आदेश बजावण्यात आले आहेत.

शाळा, निवासी शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कोविडसंबंधी नियमावलींचे पालन करावे, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायजरचा वापर, कोविडची लक्षणे आढळून आलेल्यांची अधिक तपासणी करून घेणे आदी उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांच्या प्रमुखांवर राहणार आहे. निवासी शाळा तसेच निवासी गृहांतील विद्यार्थ्यांना संबंधित कोविड नोडल अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आपल्या कटुंबिय, मित्र किंवा पै-पाहुण्यांना भेटता येणार नाही. या शाळा व निवासीगृहात असणाऱ्या महाराष्ट्र आणि केरळमधील विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याची सूचना संबंधित प्राधिकारला करण्यात आली आहे. एखाद्यावेळी विद्यार्थी आपल्या राज्यात जाऊन परत येणार असल्यास तेथून 72 तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी-पीसीआर चाचणी (निगेटिव्ह) प्रमाणपत्र आणणे बंधनकारक राहणार आहे.

या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांवर "संसर्गजन्य रोग नियंत्रक कायदा'' अंतर्गत संस्था प्रमुखांना जबाबदार ठरविण्यात येणार आहे. हा नियम केरळ व महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांनाही लागू राहणार असल्याचे राज्य सरकारच्या सचिवालयांनी आपल्या आदेश पत्रात म्हटले आहे.प्रारंभी केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने तेथून येणाऱ्यांसाठी हे आदेश दिले होते. पण, शनिवारी संध्याकाळी राज्य सरकारने नवा आदेश बजावताना महाराष्ट्रातील प्रवाशांनाही नियमावली कडक केली आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये रूग्णसंख्या वाढत असल्याने त्या शहरांच्या उल्लेखासह नवा आदेश काढण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्याशी लागून महाराष्ट्राची सीमा असल्याने बेळगावच्या आरोग्य खात्याला खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

"महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी गोमंतकीयांनी घाबरण्याची गरज नाही. सरकारचे कोरोनाच्या देशभरातील स्थितीवर लक्ष आहे. ज्यावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागेल, ती केली जाईल, त्याची तयारी आहे. याआधीही कोरोनाचा कहर देशभरात असताना संयमाने सरकारने परिस्थिती हाताळली होती. जनतेने घाबरून न जाता मास्क वापरणे, सॅनिटायझर्सचा वापर करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे सुरुच ठेवावे."

-डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com