भारताता जानेवारी २०२१ मध्ये कोरोना लसीला मान्यता मिळण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

 जागतिक पातळीवर ब्रिटन आणि रशियाने कोरोनावरील लसीकरणासाठी पुढाकार घेतला असतानाच भारतामध्ये डिसेंबरच्या अखेरीस किंवा नव्या वर्षात जानेवारी महिन्यामध्येच लशीला आपत्कालीन मंजुरी मिळू शकते, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.

नवी दिल्ली :  जागतिक पातळीवर ब्रिटन आणि रशियाने कोरोनावरील लसीकरणासाठी पुढाकार घेतला असतानाच भारतामध्ये डिसेंबरच्या अखेरीस किंवा नव्या वर्षात जानेवारी महिन्यामध्येच लशीला आपत्कालीन मंजुरी मिळू शकते, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.

गुलेरिया म्हणाले की, ‘‘भारतामध्ये सध्या अनेक लशी या अंतिम टप्प्यात आहेत, यामुळे डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीमध्ये यातील एखाद्या लशीस आपत्कालीन मंजुरी मिळू शकते. ही मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. नियामक यंत्रणेकडून मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल.’’ सध्या भारतामध्ये विविध संस्थांमध्ये सहा लशींवर काम सुरू आहे.

पूर्ण सुरक्षित

लशींच्या सुरक्षिततेबाबत भारत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. आतापर्यंत सत्तर ते ऐंशी हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली, त्यांचे कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल परिणाम दिसून आलेले नाहीत. या माहितीवरूनच ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट होते, असे गुलेरिया यांनी सांगितले. सुरवातीच्या टप्प्यामध्ये मर्यादित स्वरूपात लस उपलब्ध करून देण्यात येईल, त्यानंतर ती कोणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम निश्‍चित केला जाईल, तसा तो सरकारने आधीपासून निश्‍चित केला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना योद्धे यांना ही लस सर्वात आधी देण्यात येईल असे त्यांनी नमूद केले.

 

तुर्कस्तानमध्येही होणार लसीकरण

ब्रिटन, रशियापाठोपाठ तुर्कस्तानने देखील लसीकरणासाठी वेगाने पावले टाकायला सुरवात केली आहे. कोरोनाव्हॅक या चिनी बनावटीच्या लशीचा येथे लसीकरणासाठी वापर करण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील सक्रिय न झालेली लस अकरा डिसेंबरनंतर तुर्कस्तानमध्ये दाखल होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण केले जाणार आहे.

 

अधिक वाचा :

किमान हमीभावासाठी वेगळा कायदाच तयार करा ; आंदोलक शेतकऱ्यांची मागणी 

संबंधित बातम्या