आदर पुनावाला यांनी घेतली कोरोनाची लस; म्हणाले सुरक्षित आणि प्रभावी (व्हिडीओ)

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी स्वतःला लस घेत, देशातील जनतेला कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा संदेश दिला आहे. 

कोरोनाविरुद्धची शेवटची लढाई आजपासून देशात सुरु झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या मोहिमेचे शुभारंभ केले. त्यामुळे देशभरातील 3006 लस केंद्रांवर लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. यानंतर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी स्वतःला लस घेत, देशातील जनतेला कोविशील्ड लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा संदेश दिला आहे. 

लडाख मधील ITBP च्या 20 जवानांना देण्यात आली कोरोनाची लस 

आदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोविशील्ड ही लस अ‍ॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आहे. ही लस आज आदर पुनावाला यांनी घेतली आहे. आदर पुनावाला यांनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून कोविशील्ड लस घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय या व्हिडिओ सोबत आदर पुनावाला यांनी, भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच आदर पुनावाला यांनी आपल्या या ट्विट मध्ये, कोविशील्ड लस ही ऐतिहासिक प्रयत्नांचा एक भाग असल्याचे नमूद केले आहे. याव्यतिरिक्त, लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा संदेश देण्यासाठी स्वतः ही लस घेत असल्याचे आदर पुनावाला यांनी आपल्या या व्हिडिओ ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच डीसीजीआयने सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन मंजुरी दिली होती. ही मंजुरी मिळाल्यानंतर आदर पुनावाला यांनी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले होते. तसेच शास्त्रज्ञ, तज्ञ आणि त्याच्याशी संबंधित सर्व लोकांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत लस विकसित करण्यासाठी खूप परिश्रम घेतल्याचे आदर पुनावाला यांनी यावेळेस सांगितले होते.                        

संबंधित बातम्या