कोरोना लस काही आठवड्यांतच उपलब्ध होणार ; सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांची घोषणा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

कोरोनाला प्रतिबंध करणारी लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होईल, अशी दिलासादायक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या लशीचा दर सर्वसामान्यांना परवडणारा असावा, यासाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

नवी दिल्ली :  कोरोनाला प्रतिबंध करणारी लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होईल, अशी दिलासादायक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या लशीचा दर सर्वसामान्यांना परवडणारा असावा, यासाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच, ज्येष्ठ नागरिक, कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले.

कोरोना संकटावर चर्चा करण्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे  नेते राहुल गांधींनी ट्विटद्ववारे पंतप्रधानांना सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस कधीपर्यंत मिळेल, असा सवाल केला होता. 

राज्यांची भूमिका महत्त्वाची

या बैठकीत मोदी म्हणाले, की ‘कोरोनावरील आठ संभाव्य लशींची चाचणी सुरू असून शास्त्रज्ञांनी हिरवा कंदिल दाखविताच लसीकरणाला सुरवात होईल. लसीकरणाच्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, लसीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावेत यासाठी राज्यांशी बोलणी सुरू आहे. लस वितरणात राज्यांची भूमिका महत्त्वाची असेल. कोरोना लशीवरील संशोधनाबद्दल मोदी म्हणाले, की संपूर्ण जगाचे लक्ष किफायतशीर आणि सुरक्षित लशीकडे लागले आहे. साहजिकच यासाठी भारतावरही जगाचे लक्ष आहे.  या सर्वपक्षीय बैठकीतून या संभाव्य लशीवर व्यक्त केलेला विश्वास कोरोनाविरोधातील लढाई बळकट करणारा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली होती आणि लसीकरणासाठी राज्यांकडून अनेक सूचनाही करण्यात आल्या आहेत.’ 

तज्ज्ञांचा समूह स्थापन 

लस वितरणासाठी सरकारने राष्ट्रीयपातळीवरील तज्ज्ञांचा समूह (नॅशनल एक्सपर्ट ग्रुप) तयार केला असून या समूहाच्या शिफारशीनुसार काम होईल, असे सांगताना मोदी म्हणाले, की आतापर्यंतचा भारताचा लसीकरणाचा अनुभव आणि त्यासाठी उपलब्ध असलेली व्यापक यंत्रणा याआधारे केंद्र सरकार कोरोना लस वितरणासाठी राज्य सरकारांच्या मदतीने काम करत आहे.  राज्यांच्या मदतीने लस साठवणीसाठीची शीतगृहे, इतर सहाय्याचा तपशील जाणून घेतला जात आहे. आतापर्यंत आठ लशींची चाचणी टप्प्यात असून येत्या काही आठवड्यांत लसीबाबत खुशखबर मिळण्याची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या