लवकरच खासगी रुग्णालयातही होणार कोरोनाची लस उपलब्ध; जाणून घ्या काय असेल किंमत

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोनाची लस उपल्बध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्यात आली. भारत सरकारने सीरम इन्सिट्यूटच्या कोवीशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या दोन लसींना मान्यता दिली होती. त्य़ामुळे देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोनाची लस उपल्बध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली. लवकरच या संदर्भातील घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र खासगी रुग्णालयात गेल्यानंतर पैसे देऊन घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कोरोना लसीचे दरसुध्दा सरकारने निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे.

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘’आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खासगी ठिकाणी (रुग्णालयात) कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सरकारकडून कोरोना लसीची किंमतही निश्चित करण्यात येईल. मात्र केंद्र सरकारकडून दिली जाणारी कोरोनाची लस मोफत असणार आहे. तिचा खर्च संपूर्णपणे सरकारकडून उचलला जाणार आहे’’.

काँग्रेस पक्ष हा कमकुवत झाला असल्याची आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांची कबुली 

दरम्यान कोरोना लसीची किंमत खासगी ठिकाणी 250 रुपये निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या किंमतीमध्ये 100 रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट असणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून या किंमतीबद्दल अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. ती लवकरच केली जाण्याची शक्यत वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील यासंदर्भात यापूर्वी संकेत दिले होते. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाविषयी माहिती दिली आहे.  

 

संबंधित बातम्या