एकशे तीस कोटी भारतीयांच्या महत्त्वाकांक्षा अद्यापही बुलंदच: मोदी

पीटीआय
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

अनपेक्षितपणे आलेल्या संसर्गाने अनेक गोष्टींवर परिणाम केला आहे, देशाच्या सहनशीलतेची आणि आरोग्य व आर्थिक व्यवस्थेची परीक्षा पाहिली आहे. तरीही या संसर्गाचा भारतीयांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेवर काहीही परिणाम झाला नसून त्या बुलंदच आहेत. 

नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला असला तरी एकशे तीस कोटी भारतीयांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा अद्यापही बुलंदच आहेत, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

भारत-अमेरिका व्यूहरचनात्मक भागीदारी व्यासपीठाने (यूएसआयएसपीएफ) आयोजित केलेल्या तिसऱ्या नेतृत्व परिषदेत मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज भाषण केले. 

‘नव्या आव्हानांची दिशा’ हा या परिषदेचा यंदाचा विषय होता. मोदी म्हणाले की, लोकसंख्या १३० कोटी आणि स्रोत मर्यादित अशी परिस्थिती असतानाही भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढत आहे. गेल्या काही महिन्यात भारतात अनेक मोठ्या सुधारणा झाल्या. यामुळे उद्योग करणे सोपे झाले असून लालफितीचा कारभारही कमी झाला आहे. भारताने पारदर्शी करव्यवस्था अमलात आणली असून यामुळे प्रामाणिक करदात्यांना संरक्षण मिळाले आहे. अनपेक्षितपणे आलेल्या संसर्गाने अनेक गोष्टींवर परिणाम केला आहे, देशाच्या सहनशीलतेची आणि आरोग्य व आर्थिक व्यवस्थेची परीक्षा पाहिली आहे. तरीही या संसर्गाचा भारतीयांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेवर काहीही परिणाम झाला नसून त्या बुलंदच आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या