सरकार पाडण्याचा कट त्यांनीच आखला होता

Avit Bagle
गुरुवार, 16 जुलै 2020

अशोक गेहलोतांचा पायलट यांच्यावर वार

नवी दिल्ली

राज्यातील राजकीय नाट्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज चोवीस तासांनंतर आपले मौन सोडले. सचिन पायलट यांच्यावर थेट टीका करताना त्यांनी ताज्या राजकीय बंडावरही भाष्य केले. आमदारांच्या घोडेबाजाराचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत, ही मंडळी (पायलट गट) यामध्ये सहभागी आहेत. नव्या पिढीला हा घोडेबाजार आवडू लागला, त्यालाच ते प्रोत्साहन देऊ लागले तर देशाचे वाटोळे होणार नाही का? असा थेट सवाल गेहलोत यांनी केला.
‘‘ राजस्थानातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी हीच मंडळी डील करत होती. आमदारांना पैशाचे आमिष दाखविले जात होते. आम्हाला आमच्या आमदारांना दहा दिवस हॉटेलात ठेवावे लागले. आम्ही आमदारांना हलविले नसते तर येथेही मध्यप्रदेशची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असती. रात्री दोन वाजेपर्यंत आमदारांशी संपर्क साधला जात होता. ज्यांनी हे कारस्थान आखले तीच मंडळी आता स्पष्टीकरण देत आहेत,’’ असा हल्लाबोल गेहलोत यांनी केला. ‘‘ दिल्लीत बसलेल्या लोकांनी येथील सरकार पाडण्याचे कारस्थान रचले होते. कर्नाटक आणि मध्यप्रदेशप्रमाणे येथे देखील लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिसऱ्या वेळेस मी मुख्यमंत्री बनलो आहे, आम्हालाही यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. चाळीस वर्षे आम्ही संघर्ष केला. मेहनत करणारी मंडळीच आज मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि पक्षातील ज्येष्ठ नेते बनले आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

त्यांना मेहनतीशिवाय सगळे मिळाले
पायलट यांच्यावर निशाणा साधताना गेहलोत म्हणाले की, ‘‘ ते म्हणतात की आम्हाला तरुण नेतृत्व आवडत नाही. राहुल, सोनिया गांधी आणि खुद्द अशोक गेहलोत यांनाही तेच आवडतात. पक्षाच्या बैठकीमध्येही एनएसयूआय आणि तरुणांची बाजू मांडण्याचे काम मी करतो. हे कधी भरडल्या गेलेले नाहीत, त्यामुळे त्यांना आम्ही काय म्हणतो हे समजणार नाही. यांना केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी कधीच फार मेहनत करावी लागली नाही. त्यांनी ही मेहनत घेतली असती तर आज काही तरी चांगले काम केले असते,’’ असा टोलाही गेहलोत यांनी लगावला.

केवळ चांगली हिंदी अथवा इंग्रजी बोलणे, वक्तव्ये करणे म्हणजे सर्वकाही नसते. देशासाठी तुमच्या मनात काय आहे? तुमची कटिबद्धता कशाशी आहे? पक्षाचे धोरण आणि विचारधारेप्रति असणारी तुमची कटिबद्धता पाहिली जाते. ताटातील सोन्याचा चमचा खाण्यासाठी नसतो.
-अशोक गेहलोत, मुख्यमंत्री राजस्थान

पायलट यांना भाजपमध्ये जायचे नसेल तर त्यांनी हरियानात त्यांचे आदरातिथ्य घेऊ नये, स्वगृही परतावे. मागील चोवीस तासांमध्ये भाजपचा घोडेबाजार दिसून आला. त्यांनी आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.
रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस

जिल्हा समित्या विसर्जित
पायलट यांच्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्हा आणि ब्लॉक समित्या विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांनी आज ही घोषणा करताना नव्या समित्यांची स्थापनाही लवकर केली जाईल असे म्हटले आहे. पायलट यांच्या समर्थकांना हटविण्यासाठीच हे पक्षांतर्गत फेरबदल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या