कोविड रूग्ण मृत्यूचे प्रमाण भारतामध्ये कमी: डॉ. हर्षवर्धन

pib
गुरुवार, 9 जुलै 2020

या बैठकीला आरोग्य सचिव प्रीती सुदन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, औषध विभागाचे सचिव पी. डी. वाघेला, नौवहन सचिव संजीव रंजन, वस्त्रोद्योग सचिव रवी कपूर, 'डीडब्ल्यूएस'चे सचिव परमेश्वरन अय्यर, सचिव अजय प्रकाश सोहनी, 'आयटीबीपी'चे प्रतिनिधी हे आभासी माध्यमाव्दारे उपस्थित होते. 

नवी दिल्ली, 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 साठी विशेष नियुक्त करण्यात आलेल्या मंत्री समुहाची 18वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीला केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप एस. पुरी आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित होते. रसायन आणि खते, तसेच नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय, निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद पॉल व्हिडिओ कॉन्फरन्स लिंकच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

यावेळी प्रारंभी देशातल्या कोविड-19 विषयीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जागतिक तुलनेमध्ये सर्वात जास्त कोविड रूग्ण असलेल्या पाच देशांमध्ये आता भारत आला आहे. मात्र प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केल्यास भारतामध्ये कोविडचे सर्वात कमी (538) रूग्ण आहेत. तसेच भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही सर्वात कमी (15) आहे. जागतिक सरासरी आकडेवारीनुसार हे प्रमाण अनुक्रमे 1453 आणि 68.7 आहे. कोविडच्या सक्रिय म्हणजेच कोरोनाबाधित रूग्ण देशातल्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये जवळपास 90 टक्के आहेत. तर 49 जिल्ह्यांमध्ये एकूण रूग्णसंख्येपैकी 80टक्के कोविड रूग्ण आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्ये एकूण मृत्यूंपैकी 86 टक्के रुग्ण मृत्यू पावले आहेत. तर 32 जिल्हयांमध्ये एकूण 80 टक्के मृत्यू झालेले आहेत. या विशिष्ट भागामध्ये मृत्यूदर का जास्त आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली. 

देशामध्ये कोविड-19चा वाढता प्रसार लक्षात घेऊन आरोग्य दक्षतेसाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती बैठकीत देण्यात आली. देशात एकूण 3914 स्थानांवर कोविड-19 रूग्णांसाठी आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये 3,77,737 विलगीकरण खाटांची सुविधा आहे (अतिदक्षता सेवेशिवाय), तसेच 39,820 अतिदक्षता सुविधा पुरवणा-या खाटा आणि 1,42,415 आॅक्सिजनचा पुरवठा करू शकणा-या खाटा आहेत. यापैकी 20,047 खाटांना व्हँटिलेटर्सची सोय आहे. कोविड रुग्णांना आरोग्य सुविधा देणा-या वैद्यकीय पथकांसाठी 213.55 लाख एन95 मास्क, 120.94 लाख पीपीई संच आणि रूग्णांसाठी 612.57 लाख एचसीक्सू औषधाच्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.    

संपादन- तेजश्री कुंभार 

 

 

संबंधित बातम्या