कोविड रुग्ण कारवार इस्पितळातून पळाला

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

कारवार पोलिसांनी मल्लापूरजवळ पकडले

पणजी

कारवार येथील जिल्हा रुग्णालयातून कोविडचा रुग्ण आज दुपारी पळाला. पोलिसांनी शिताफीने त्याला मल्लापूरजवळ पकडले. तो कारवार कद्रा मल्लापूर बसने पळून जात होता. हा रुग्ण चोरीप्रकरणाचा संशयित असून तो पूर्वी शिरसी येथील तुरुंगात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात असताना त्याला कोविडची लागण झाल्याची लक्षणे आढळल्याने त्याची चाचणी करण्यात आली होती. त्याला कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला कारवारच्या जिल्हा सरकारी इस्पितळात उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याने डॉक्टर व परिचारीका येऊन गेल्यानंतर खिडकीच्या काचा व गज काढून पलायन केले. तेथून तो चालतच मागील बाजूने बसस्थानकावर आला.
कारवार ते मल्लापूर बसमध्ये तो बसला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्याचे छायाचित्र सर्व तपासणी नाक्यांवर पाठवले. तो रुग्ण मल्लापूरपर्यंत बसने व पुढे कद्राच्या जंगलातून यल्लापूरपर्यंत व तेथून शिरसी गाठण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, मल्लापूर येथील तपासणी नाक्यावर तो पोलिसांना सापडला. पोलिसांना पाहताच त्याने धूम ठोकली. मात्र, त्याचा पाठलाग करण्यात आला. त्याला पकडण्यासाठी पीपीई कीट परिधान केलेले कर्मचारी मागवण्यात आले. त्याला चारही बाजूने घेरल्यानंतर तो पुन्हा इस्पितळात जाण्यास तयार झाला. त्याला खास रुग्णवाहिकेतून परत कारवारला हलवण्यात आले. तोवर सायंकाळ झाली होती. बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी करण्यासाठी कारवार जिल्हा प्रशासनाने त्यांना अलगीकरणात पाठवले आहे.

 

 

संबंधित बातम्या