दिल्लीत आता फटाक्यांवरून आतषबाजी

दिल्लीत आता फटाक्यांवरून आतषबाजी
Cracker sellers should be given compensation as the decision to ban the crackers has been taken to late says BJP leader Vijay Goyal

नवी दिल्ली :  केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राजधानीची सूत्रे असलेला आप यांच्यात आता फटाक्यावरून आतषबाजी सुरू झाली आहे. फटाक्यांवर बंदीचा निर्णय ऐनवेळी घेतल्यामुळे विक्रेत्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप नेते विजय गोयल यांनी रविवारी केली.

गोयल यांनी धरणे धरले. आमदार अनिल वाजपेयी, दिल्ली व्यापार महासंघाचे अध्यक्ष देवराज बवेजा, तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सर्व प्रकारच्या फटाकेविक्रीवर बंदी घातली. राजधानीतील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू झाली.
गोयल यांनी सांगितले की, विक्रेत्यांनी परवाना प्राप्त करून लाखो रुपयांचे फटाके खरेदी केले आहेत. बंदीमुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल. त्यामुळेच सरकारने भरपाई द्यावी.

हरित फटाक्यांनाही फटका

विशेष म्हणजे हरित म्हणजे पर्यावरणपूरक फटाक्यांवरही बंदी आली. अशा फटाक्यांतलिथीयम, शिसे, आर्सेनिक, बेरीयम अशा रसायनांचा वापर केला जात नाही. सीएसआयआर (शास्त्रीय-औद्योगिक संशोधन संस्था) व निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) या संस्थांची त्यास मान्यता असते.

सात जणांना अटक
अवैध फटाकेविक्री केल्याबद्दल रविवारी पोलिसांनी सात जणांना अटक करून सुमारे सहाशे किलो फटाके जप्त केले. फटाके वाजवल्याबद्दल आठ गुन्हे दाखल करण्यात आले. एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून एक किलो फटाके पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिल्लीतील प्रदुषणाचा मुकाबला करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे फटाकेविक्रेत्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. फटाकेबंदीला आपला विरोध नसला तरी हा निर्णय सहा महिन्यांपूर्वी जाहीर व्हायला हवा होता.
- विजय गोयल, भाजप नेते

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com