''भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन आणि वॉशिंग पावडर'' 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचे म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचे म्हटले आहे. तृणमूल कॉंग्रेस सोडून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांचा नंदीग्राम हा गढ मानला जातो. सुवेंदू अधिकारी यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राम मध्ये मेगा रॅलीचे आयोजन करत, सुवेंदू अधिकारी यांना मोठा शह देण्याचा प्रयत्न केला. आणि या रॅलीतच ममता बॅनर्जी यांनी आपण आगामी निवणूक नंदीग्राम मधून लढवणार असल्याचे जाहीर केले.  

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मध्ये आयोजित केलेल्या आजच्या रॅलीत भाजपावर जोरदार टीका देखील केली आहे. ममता बॅनर्जी यांनी टीका करताना, भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन व वॉशिंग पावडर असल्याचे म्हटले. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर वॉशिंग मशीन व वॉशिंग पावडर प्रमाणे सर्वजण स्वच्छ होत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी आपण जिवंत असेपर्यंत बंगाल विकू देणार नसल्याचे म्हणत, आपले हे खुले चॅलेंज असल्याचे सांगितले.      

तृणमूल काँग्रेसमध्ये असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी मागील महिन्यातच भारतीय पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांचा गड समजल्या जाणाऱ्या नंदीग्राम मधून आगामी निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करून मोठी राजकीय चाल खेळली असल्याचे मानण्यात येत आहे. नंदीग्राम शिवाय ममता बॅनर्जी आपल्या पारंपरिक जागा भवानीपूरमधूनही निवडणूक लढवणार आहेत. 

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र मिळून मैदानात उतरणार आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने 120 ते 130 जागा मागितल्या असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु यासाठी डावे आघाडी सहमत नसल्यामुळे अजून तरी बोलणी पुढे सरकली नसल्याचे समजते. तर 2016 मध्ये झालेली निवडणूक काँग्रेस आणि डावे आघाडी यांनी एकत्र मिळून लढवली होती.  
 

संबंधित बातम्या