बरे झालेल्या रुग्णांचा "कोविडयोद्धा क्‍लब'

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात अनोखा पुढाकार
 

कोलकता

कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग लक्षात घेता त्याच्याशी लढताना विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, एक अनोखा पुढाकार पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांनी घेतला आहे. या रुग्णांनी "कोविडयोद्धा क्‍लब' स्थापन केला असून, ते आता आपल्या अनुभवांचा उपयोग नागरिकांना कोरोना होण्यापासून रोखण्यासाठी करणार आहेत.
यासंदर्भात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली. आत्तापर्यंत राज्यात 60 टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यातील रुग्णांनी या क्‍लबमध्ये भाग घेतला आहे. त्या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले आहे. हे कोरोनामुक्त रुग्ण अन्य रुग्णांना जेवण देणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांना रोगमुक्त होण्यासाठी सल्ला देणे, अशी कामे करणार आहेत. त्यांना राज्य सरकार मानधन, भोजन आणि राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देणार आहे. लवकरच हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे.

प्रवाशांना रोखण्याची केंद्राला विनंती
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की, पाच राज्यांमधून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि विशेष रेल्वे तसेच विमानसेवा थांबविण्यात यावी. या पाच राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने पश्‍चिम बंगालमध्येही संसर्ग वाढू शकतो. मात्र, पाच राज्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

आज राज्यात "डॉक्‍टर्स डे'
राज्यातील डॉक्‍टर कोरोनाशी दिवस-रात्र लढत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये उद्या (ता. 1) "डॉक्‍टर्स डे' पाळण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडेच आरोग्यमंत्रिपदाचा कार्यभार आहे. लवकरच राज्यभर टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगळा मोबाईल क्रमांक असेल, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या