नेतृत्व बदलावरून काँग्रेसमध्ये दोन गट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

काही खासदार आणि माजी मंत्र्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी केली असून अन्य मंडळी मात्र पक्षाचे नेतृत्व हे राहुल गांधी यांच्याकडे सोपविले जावे म्हणून आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले असून यावरूनही पक्षांतर्गत दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. उद्या(ता.२४) रोजी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आता भाकरी फिरवाच अशी मागणी विविध ज्येष्ठ नेत्यांकडून हायकमांड केली जाऊ लागली आहे. काही खासदार आणि माजी मंत्र्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी केली असून अन्य मंडळी मात्र पक्षाचे नेतृत्व हे राहुल गांधी यांच्याकडे सोपविले जावे म्हणून आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पक्षाच्या बारापेक्षाही अधिक नेते आणि काही माजी मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी संघटनात्मक संरचनेतील सर्वांगिण बदल आणि नव्या नेतृत्वाचा आग्रह धरल्याचे दिसून येते. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीला उद्देशून एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी पक्षाची धुरा ही पुन्हा राहुल यांच्याकडेच सोपविण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे. यामुळे उद्या होणारी कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. व्यापक बदलांसाठी आग्रही असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने कुणाला तरी मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधावीच लागली असती अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही सोनिया  अथवा राहुल यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही, केवळ बदलांचा आग्रह धरला असल्याचेही त्या नेत्याने सांगितले. हे पत्र या सर्व नेत्यांनी सात ऑगस्ट रोजीच सोनियांना लिहिल्याचे समजते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यावर पक्षांतर्गत व्यापक विचारमंथन केले गेले नाही. पक्षाचे नेतृत्वही जबाबदारी घेताना दिसत नाही अशी खंत या नेत्यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केली आहे.

राजीनामा देण्याची तयारी?
काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचा दावा केला जात आहे. तसेच, अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती सापडेपर्यंत त्या पद सांभाळू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी मात्र अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास तयार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या