बसपाच्या सहा आमदारांचा फैसला ११ ऑगस्टला

PTI
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

पक्षांतराबाबत न्यायालयाने आमदारांना नोटीस बजावली असून त्यास ८ ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

जयपूर

राजस्थानातील राजकीय घडामोडी अजूनही थांबलेल्या नाहीत. बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांच्या पक्षांतराला स्थगिती मिळणार की नाही यावर आता ११ ऑगस्टला निर्णय होणार आहे. यासंदर्भात एक सदस्यीय पीठासमोर याचिकेवर दिवसभर सुनावणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. पक्षांतराबाबत न्यायालयाने आमदारांना नोटीस बजावली असून त्यास ८ ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार नऊ महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यास सभापतीने मंजूरी दिल्यानंतर याविरुद्ध भाजपचे आमदार मदन दिलावर आणि बसपाने पक्षांतराच्या निर्णयास आव्हान दिले. यावर ११ ऑगस्ट रोजी सुनावणी आणि निकाल दिला जाणार आहे. यादरम्यान, राजस्थान खंडपीठाने त्याच दिवशी सुनावणी करून लगेच निकाल द्यावा, असे निर्देश एक सदस्यीय पीठाला दिले. त्यामुळे पक्षांतरावरील स्थगितीबाबत येत्या मंगळवारी निकाल येणे अपेक्षित आहे. तसेच जोपर्यंत प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत सहा आमदारांना विश्‍वासदर्शक ठरावात मतदान करण्याचा अधिकार देऊ नये, अशी मागणी बहुजन समाज पक्षाने केली आहे. नजरकैदेत असलेल्या आमदारांना नोटिस कशी बजावणार? असा प्रश्न आमदार दिलावर यांनी वकिलांमार्फत उपस्थित केला. तेव्हा खंडपीठाने म्हटले की, एक सदस्यीय पीठाने अद्याप याचिका फेटाललेली नाही. त्यामुळे आम्ही त्यास स्थगिती देऊ शकत नाही. मात्र नोटिशीची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. त्याची जबाबदारी जैसलमेर जिल्हा न्यायधीशांना दिली जाणार आहे. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेतली जाईल. सध्या गेहलोत गटाचे आमदार जैसलमेर येथे नजरकैदेत आहेत. त्यात बसपमधून गेलेल्या सहा आमदारांचा देखील समावेश आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या