सरकारने शेतकऱ्यांचे मुद्दे समजून घ्यावेत; विरोधी पक्षाच्या नेत्यांचे राष्ट्रपती कोविंद यांना निवेदन

गोमंतक ऑनलाईन टीम
बुधवार, 9 डिसेंबर 2020

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी होणाऱ्या शेतकरी आंदोलनादरम्यान विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली.

नवी दिल्ली- कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी होणाऱ्या शेतकरी आंदोलनादरम्यान विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली. काँग्रेसचे नेते राहूल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांसह अन्य दोन नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीत सर्वच नेत्यांनी एकमताने हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे मुद्दे समजून घ्यावेत, असेही या नेत्यांनी यावेळी म्हटले आहे.    
 
'तीनही कायदे संसदेत चर्चा न होताच पास झाले आहेत. शेतकऱ्यांनी देशाचा पाया रचला आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत', असे राहूल गांधी यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले,'शेतकऱ्यांच्या शक्तीसमोर कोणीच उभे राहू शकत नाहीत. भारताचा शेतकरी मागे हटणार नाही आणि घाबरणारही नाही. कायदे रद्द होत नाहीत तोवर शेतकरी आंदोलन करत राहतील.' 

याबरोबरच सीपीएमचे नेते सीताराम येच्युरी यांनी आपण राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याचे म्हटले आहे. लोकशाही मार्गाचा गैरवापर करून पारित झालेले कृषी कायदे आणि वीज संरक्षण बील रद्द करण्याचे आपण सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एवढ्या थंडीतही शेतकरी आंदोलन करत असून त्यांचे मार्ग लावत सरकारने त्यांचे समाधान केले पाहिजे, असे म्हटले आहे.    

पंजाब तसेच हरियाणामधील या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसबरोबरच अन्य विरोधी पक्षांनीदेखील पाठिंबा दर्शविला असून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. हीच मागणी करण्यासाठी आज पाच नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेटले. यांमध्ये राहूल गांधी, सीताराम येच्युरी, शरद पवार, डी राजा तसेच टी के एस इलेनगोवन यांचा समावेश होता. 

संबंधित बातम्या