राजधानीत अखेर मेट्रो धावली

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

साडेपाच महिन्यांहून अधिक काळ बंद; टप्प्याटप्प्याने सेवा सुरू होणार

नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे साडेपाच महिन्यांहून जास्तकाळ बंद असलेली दिल्लीसह १२ राज्यांतील मेट्रोसेवा आजपासून टप्याटप्याने सुरू झाली. दिल्ली मेट्रो यलो लाइनवर सुरू झाल्याने दिल्लीकरांनी नियम, वेळा व अटींच्या अडचणी सहन करूनही तिचे उत्स्फूर्त स्वागत केले.
 
मेट्रो अखेर पुन्हा सुरू झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी भावविभोर होऊन ‘पहिल्या प्रवासाची’ छायाचित्रे स्वतःच्या व मेट्रोच्याही ट्विटरवर टाकली व त्यातील अनेक दिल्ली मेट्रो महामंडळानेही (डीएमआरसी) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. यलो लाईन (समयपूर बादली-हुडा सिटी सेंटर) ही मेट्रोसेवा सुरू होताच ट्विटरवर छायाचित्रे व त्यावरील टिप्पण्यांचा पाऊस पडू लागला. 

दिल्लीत मेट्रो सुरवातीला सकाळी ७ ते ११ व दुपारी ४ ते ८ याच काळात सुरू राहील व नंतर टप्याटप्याने वेळ वाढविला जाईल. ब्ल्यू लाईन (द्वारका-नोएडा-व द्वारका -आनंद विहार वैशाली) ही आणखी एक मार्गिका बुधवारपासून सुरू होणार आहे. त्यानंतर १२ सप्टेंबरपर्यंत टप्याटप्याने इतर मार्गिका खुल्या करण्यात येतील. डीएमआरसीने सोशल डिस्टन्सिंग व मास्क बंधनकारक करण्यासह आरोग्यविषयक नियम अंमलात आणले आहेत. अस्वस्थता वाटत असेल तर मेट्रो प्रवास टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मेट्रो सेवेतील नवे बदल

  •     स्थानकावरील टोकनप्रणाली पूर्णतः बंद 
  •     प्रत्येक प्रवाशाला स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक
  •     दोन प्रवाशांनीही विशिष्ट अंतर (दो गज की दूरी) राखणे अनिवार्य
  •     राजीव चौक, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय व विश्वविद्यालय यासह १७ स्थानकांवर हॅंड सॅनिटायजर व थर्मल स्क्रिनिंग
  •     यलो लाइनवरील ३७ स्थानकांवरची निवडक प्रवेशद्वारे उघडली
  •     सुरुवातीला ५७ गाड्या दिवसभरात ४६२ फेऱ्या करणार

 

संबंधित बातम्या