शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीस दिल्ली पोलिसांकडून सशर्त परवानगी; पाक मधील 308 ट्विटर हँडल्सवर नजर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना किसान ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना किसान ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 26 जानेवारी रोजी शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढतील. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडबाबत दिल्ली पोलिस चांगलेच सतर्क झाले आहेत. 26 जानेवारीला देशाची नजर दिल्लीकडे असताना अशा वेळी शेतकरी परेड काढत आहेत. त्यामुळे या रॅलीसाठी काही शर्तींच्या आधारावरच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आज दिल्ली पोलिसांनी सांगितली. 

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. आणि या रॅलीसाठी शेतकरी आणि पोलीस यांच्यात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली साठी काही अटींसह परवानगी दिली आहे. दिल्लीतील तीन ठिकाणी रॅली काढण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगी दिली असल्याची माहिती आज दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली. तसेच या रॅलीच्या वेळेस कोणतीही गडबड खपवून घेणार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेड मध्ये गडबड करण्यासंबंधित काही इनपुट्स देखील मिळाले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी आज दिली. व त्यासाठी पाकिस्तान मध्ये ओपन करण्यात आलेल्या 308 ट्विटर हँडल्सवर देखील बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. 

तसेच, सीएपीएफच्या जवानांना स्टँडबायमध्ये तयार राहाण्यास सांगितले असून, सीएपीएफच्या जवानांना शॉर्ट नोटीसमध्ये कारवाईसाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड रॅली आणि प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही गडबड आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तर ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीच्या सीमेवर पोहचू लागले आहेत.   

दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी देण्यात आलेले मार्ग - 

सिंघू सीमा - सिंघू बॉर्डर वरून संजय गांधी ट्रान्सपोर्ट, कंझावला, बवाना, औचिंडी बॉर्डर मार्गे हरियाणा 

टिकरी सीमा - टिकरी बॉर्डरकडून नागलोई, नजफगड, बाडली मार्गे केएमपीकडे 

गाजीपूर यूपी गेट - गाजीपूर यूपी गेटपासून अप्सरा बॉर्डर गाझियाबाद मार्गे डासनातून उत्तर प्रदेशकडे 

संबंधित बातम्या