'हिज्बुल' आणि 'खलिस्तान'शी निगडीत पाच दहशतवाद्यांना दिल्लीत अटक

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल पूर्व दिल्लीतील लक्ष्मीनगर (शकरपूर) येथे कारवाई करत पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे दहशतवादी  हिज्बुल संघटना आणि खलिस्तानी संघटनेशी निगडीत असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली  :  दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल पूर्व दिल्लीतील लक्ष्मीनगर (शकरपूर) येथे कारवाई करत पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे दहशतवादी  हिज्बुल संघटना आणि खलिस्तानी संघटनेशी निगडीत असल्याचे सांगितले जात आहे. शब्बीर अहमद, अयूब पठाण, रियाझ राथर, गुरजित सिंग आणि सुखदीप सिंग असे पाच दहशतवाद्यांची नावे आहेत. 

 

पाचही दहशतवादी पंजाब आणि काश्‍मीरचे असून त्यांचा संबंध अंमली पदार्थाच्या तस्करीशी आहे. पंजाबचे शौर्य चक्र विजेते बलविंदर सिंग सिंधू यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा या पाच जणात समावेश आहे. मुख्य शार्प शूटर गुरजित सिंग आणि सुखदिप सिंग अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत.  दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाचे पोलीस उपा आयुक्त प्रमोद कुशवाह म्हणाले की, दिल्लीतील शकरपूर भागात चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यापैकी दोन पंजाबचे आणि तीन काश्‍मीरचे आहेत. 

शकरपूर येथे झाली चकमक

पूर्व दिल्लीच्या शकरपूर भागात दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांत जोरदार चकमक झाली. दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांना हालचाल करण्यास वाव दिला नाही. चकमकीदरम्यान १३ फैरी झाडण्यात आल्या. शेवटी दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. पाचही दहशतवाद्यांचा दिल्लीत येण्याचा काय हेतू होता? याचा तपास केला जात आहे. परंतु सर्व दहशतवादी हे खलिस्तानी दहशवादी सुखसबिखरिवलच्या संपर्कात होते तर काश्‍मीरचे दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीनशी निगडीत होते. खलिस्तानी दहशतवाद आणि काश्‍मीर नेटवर्क यांनी एकत्र येऊन मोठे कारस्थान रचल्याचा संशय वर्तविला जात आहे.  
अंमलीपदार्थाचा पैसा दहशतवादासाठी: कुशवाह दहशतवाद्यांकडे दोन किलो अंमली पदार्थ, एक लाखाची रोकड आणि तीन पिस्तुल हस्तगत केल्याचे पोलिस उपायुक्त (विशेष पथक) प्रमोद कुशवाह यांनी सांगितले. अंमली पदार्थाची विक्री करून त्याचा पैसा दहशतवादी कारवायासाठी वापरला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

अधिक वाचा :

आंदोलक शेतकऱ्यांकडून आज गल्ली ते दिल्ली बंदची हाक ; देशभर अभूतपूर्व सुरक्षा

संबंधित बातम्या