आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीत वाढ करण्याचा निर्णय 

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मार्चपर्यंत वाढविली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मार्चपर्यंत वाढविली आहे. डीजीसीएने आज सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या 23 मार्चला आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील संचालन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी पुढे महिनाभर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर स्थगिती होती. परंतु देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांत तेजी दिसून आली, त्यानंतर डीजीसीएने ही बंदी आणखी एक महिना वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.   

इस्रायलच्या मालवाहू जहाजाचा समुद्रात स्फोट; दोन्ही देशांमध्ये वाढला तणाव

डीजीसीएने शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील माहिती जारी केली. डीजीसीएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात भारतातून आणि भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर 31 मार्च 2021 च्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे. शिवाय, डीजीसीएने काही विशिष्ट परिस्थितीत निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या अगोदर, युरोप, दक्षिण आफिका आणि ब्राझील यांसारख्या देशांमध्ये कोरोनाची नवी स्ट्रेन आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  

दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशांतर्गत उड्डाणांना यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यांची संख्या पूर्वीपेक्षा कमी आहे. तर वंदे भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे चालूच राहणार असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले आहे.  

संबंधित बातम्या