‘डीजीसीए’च्या 'या' नियमाचे पालन न केल्यास विमाप्रवासाला बंदी
विमान प्रवासादरम्यान जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत आणि कोविड-१९ च्या आरोग्य सूचना पाळणार नाहीत त्यांच्या विमान प्रवासावर संपूर्ण बंदी घातली जाईल. त्यांची नावे "नो फ्लाय लिस्ट'' मध्ये टाकण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली: प्रवासात मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार प्रवाशांबाबत भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाने कडक भूमिका घेतली आहे. हवाई नियमन प्राधिकरणाने(डीजीसीए) जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशांनुसार, विमान प्रवासादरम्यान जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत आणि कोविड-१९ च्या आरोग्य सूचना पाळणार नाहीत त्यांच्या विमान प्रवासावर संपूर्ण बंदी घातली जाईल. त्यांची नावे "नो फ्लाय लिस्ट'' मध्ये टाकण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. अर्थात वैद्यकीय कारणे दाखविणाऱ्यांना काही अटींवर मास्क वापरण्यातून सूट मिळू शकते, अशीही पुस्ती मंत्रालयाने जोडली आहे.
विमान प्रवासाबाबत ‘डीजीसीए’ने आज सुधारित दिशानिर्देस जारी केले. त्यानुसार आता विमानांमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ विमान कंपन्या पूर्वीसारखे देऊ शकतील. परदेश प्रवास करणाऱ्यांना त्यासाठी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून आगाऊ परवानगी घेण्याची अटही काढून टाकण्यात आली असून, ते संबंधित कंपनीकडून विमानाचे तिकीट थेट घेऊ शकतील.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांतील प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. तीनपैकी मधल्या आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना तर पीपीई कीटसारखे संपूर्ण प्रावरणच परिधान करावे लागते. मात्र काही बेजबाबदार लोक विमानात चढले की मास्क काढून ठेवतात हा विमान कंपन्यांचा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर आधी मास्क वापरण्याची विनंती करणे व तरीही न ऐकल्यास अशांची नावे नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याचा डीजीसीएने इशारा दिला.
एखाद्या प्रवाशाने वैद्यकीय कारणांमुळे प्रवासात सदैव मास्क वापरणे शक्य नसल्याची सबब पुढे केली तर त्याला इतर प्रवाशांच्या जिवीताच्या सुरक्षेची काळजी घेऊन तशी परवानगी दिली जाऊ शकते, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.
संपादन: ओंकार जोशी