पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी? वाचा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान काय म्हणतात

पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी? वाचा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान काय म्हणतात
Dharmendra Pradhan

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या टप्प्यापुर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज कोलकाता येथे एक चांगली बातमी दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी अलिकडच्या काळात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या असल्याचे सांगितले. शिवाय पुढील काही काळात इंधनाच्या या किमती अजून खाली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोलकाता येथे पत्रकारांसोबत बोलताना, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली येण्यास सुरवात झाली असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. (Dharmendra Pradhan has expressed hope that petrol-diesel rates will come down in recent times)

याशिवाय, धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनाच्या किमतींबाबत बोलताना, आपण यापूर्वीच आतंरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती उतरल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. आणि त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या किमती घसरल्या असून देशातील इंधनाचे दर कमी करण्यात आल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. तसेच, एलपीजी गॅसची किंमतही खाली येऊ लागली आहे आणि येत्या काही दिवसांत ही किंमत आणखी खाली येऊ शकते, असे त्यांनी पुढे सांगितले. 

निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्यावर 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशातील इंधनाचे दर मागील 25 दिवसांपासून वाढलेले नाहीत. तर, अलिकडच्या काळात यामध्ये 61 पैसे, 60 पैसे प्रति लिटरची कपात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय, नुकतेच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतही 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना थोड्याप्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील इंधनाच्या किंमती येत्या काही दिवसांत आणखी घसरणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच दिली होती. 

देशातील सर्वात मोठी इंधन रिफायनरी आणि किरकोळ विक्रेता इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) मते, युरोप (Europe) आणि आशियामध्ये (Asia) कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे मार्चच्या मध्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाचे दर स्थिर होण्याच्या शक्यतेमुळे पुढील काळात देशातील इंधनाचे दर सुद्धा कमी होणार असल्याचे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.    

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com