जम्मू-काश्मीरमधील सहा महत्वाच्या पुलांचे डिजिटली उद्घाटन

pib
शुक्रवार, 10 जुलै 2020

"सर्व जगात (कोविड-19 मुळे) अंतर राखण्यावर, एकमेकांपासून दूर राहण्यावर भर दिला जात असताना लोकांना जोडणाऱ्या या पुलाचे उद्घाटन करायला मिळणे, हा एक सुखद अनुभव आहे.

नवी दिल्ली, 

जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा (IB) व नियंत्रण रेषे जवळच्या (LoC) संवेदनशील सीमाभागात चांगले रस्ते व यांच्याद्वारे संपर्काचा आरंभ करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सहा मुख्य पूल देशाला अर्पण केले. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे पूल सीमा रस्ते संघटनेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहेत.

हे सहा पूल विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी सीमा रस्ते संघटनेच्या सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. अतिशय धोकादायक भूभाग व हवामान अशा परिस्थितीतही पूल उभारण्याचे महत्वाचे काम केल्याबद्दल सिंग यांनी प्रशंसा केली. रस्ते व पूल हे कोणत्याही देशाच्या जीवन रेषा असतात; तसेच दुर्गम प्रदेशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात ते महत्त्वाच्या भूमिका बजावतात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासकामांना प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या प्रकल्पांच्या वाटचालीचा नियमितपणे आढावा घेतात; तसेच  वेळच्यावेळी  त्यांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

"सर्व जगात (कोविड-19 मुळे) अंतर राखण्यावर, एकमेकांपासून दूर राहण्यावर भर दिला जात असताना लोकांना जोडणाऱ्या या पुलाचे उद्घाटन करायला मिळणे, हा एक सुखद अनुभव आहे. एवढे महत्वाचे काम अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्णत्वाला नेल्याबद्दल सीमा रस्ते संघटनेचे  मी अभिनंदन करतो", असे याप्रसंगी ते म्हणाले. 

संपादन- तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या