एनसीईआरटी आणि रोटरी इंडिया यांच्यात डिजिटल सामंजस्य करार

Pib
बुधवार, 10 जून 2020

रोटरीला ई लर्निंगचा दीर्घ अनुभव असून, त्यांनी गेल्या पाच वर्षात, देशभरातील 30 हजार सरकारी शाळांमध्ये ई-लर्निंग सॉफ्टवेअर/हार्डवेअर बसवले आहेत.    

नवी दिल्ली, 

ई-लर्निंग प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने एनसीईआरटी आणि रोटरी इंडिया यांच्यात डिजिटल माध्यमातून आज एक सामंजस्य करार करण्यात आला. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटी टीव्ही वाहिन्यांवरून अभ्यासक्रम प्रसारित करण्याबाबतचा हा करार असून मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखारियाल निशंक यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. मनुष्यबळ विभागाच्या सचिव अनिता करवाल देखील यावेळी उपस्थित होत्या.

कोविड-19 च्या संकटकाळात, रोटरी इंडीया ह्यूमेनीटी फाउंडेशन आणि एनसीईआरटी यांनी एकत्र येत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या करारामुळे, एनसीईआरटीचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम  ई-लर्निंगमार्फत देशभरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील, अशी प्रतिक्रिया पोखरियाल यांनी यावेळी दिली.

विद्यादान-2.0 या अभियानाअंतर्गत, रोटरी  इंटरनॅशनल एनसीइआरटीला  पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतील अभ्यासक्रमाचा मजकूर पूरवणार आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाचा मजकूर अत्यंत दर्जेदार आणि उच्च प्रतीचा असून, त्यामुळे विद्यार्थ्याना निश्चित लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील रोटरी क्लब आवश्यक ती साधने आणि अभ्यासक्रम पुरवणार आहे. तसेच प्रौढ साक्षरता अभियानातही पूर्ण योगदान देणार आहे. ते शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षणासाठीही अभ्यासक्रम देणार आहेत, असे निशंक यांनी सांगितले.  

देशात कोविड-19 मुळे मार्च महिन्यापासून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत सर्वोत्तम शिक्षण पोहोचावे, ज्यात भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातली असेल, असे शिक्षण मुलांना देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय अविरत कष्ट करत आहे, असे निशंक यांनी सांगितले.

विविध योजना आणि उपक्रम, जसे की ऑपरेशन डिजिटल बोर्ड, दीक्षा, ई-पाठशाला, स्वयं आणि स्वयंप्रभा अशा उपक्रमांच्या माध्यमातून तंत्रज्ञान, कल्पकता आणि शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपला अविभाग करत आहे, असे त्यांनी सांगितले. ई-लर्निंग व्यवस्था, अचूक आणि अद्ययावत शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी  सरकार काम करत आहे. या डिजिटल ई-लर्निगच्या माध्यमातून आम्हाला पंतप्रधानांच्या “एक देश-एक डिजिटल मंच’ या घोषणेला मूर्त स्वरूप द्यायचे आहे, असे ते म्हणाले .

जिथे इंटरनेट किंवा मोबाईल संपर्कयंत्रणा चांगली नाही, तिथे, रेडीओ आणि टीवीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही निश्चय केला आहे, असे निशंक यांनी सांगितले. हा सामंजस्य करार, त्याच दिशेने टाकलेले महत्वाचे पाउल आहे, असेही ते म्हणाले.  

रोटरी इंडिया ह्युमैनीटी फाउंडेशन यांच्या या प्रयत्नांबद्दल विभागाच्या सचिव अनिता करवाल यांनी त्यांचे आभार मानले.

रोटरी इंटरनैशनल चे संचालक, कमल संघवी यांनी या करारातील महत्वाचे मुद्दे सांगितले:-

  • एनसीइआरटी टीव्ही टाय अप: पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम मोड्यूल्सचे प्रसारण केले जाईल. हे प्रसारण जुलै 2020 पासून उपलब्ध असेल.  (अभ्यासक्रम एनसीआरटी च्या मान्यतेनुसार असेल)
  • दीक्षा एप टाय-अप :  ई-लर्निंग मोड्युल केंद्र सरकारचे राष्ट्रीय मोबाईल एप, दीक्षा वरूनही उपलब्ध असेल.

सध्या हा अभ्यासक्रम हिंदी भाषेत (आणि पंजाबी) उपलब्ध असून तो12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 10 लाख विद्यार्थ्यासाठी त्वरित उपलब्ध केला जाईल. या अभ्यासाक्रमाच्या मजकुराचे बौद्धिक संपदा हक्क रोटरीकडे असतील आणि ते एनसीईआरटीला दिले जाईल. त्यामुळे हा मजकूर येत्या काही महिन्यात सर्व प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित केला जाईल.

रोटरीने आपल्या भागीदारांमार्फत, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा ई-लर्निंग अभ्यासक्रम तयार केला असून तो देशाला मोफत देण्याचा आमचा मानस आहे, असे, रोटरी इंटरनैशनलचे अध्यक्ष शेखर मेहता यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या