पश्चिम घाटात पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

तेजश्री कुंभार
सोमवार, 22 जून 2020

या पालीच्या मोठ्या आकारामुळे, पोटाच्या दोन्ही बाजूला असणार्‍या टोकदार खवल्याच्या अभावामुळे तसेच नरांच्या मांडीवरती असलेल्या ठराविक संख्येच्या ग्रंथी फरकांमुळे या कुळातील इतर पालींपासून सहज वेगळी ओळखली जाऊ शकते. याचबरोबर पालीच्या या नवीन जातीचा डीएनए याच कुळातील इतर प्रजतिनपेक्षा कमीतकमी ९.१% ने विभिन्न आहे.

पणजी,

पश्चिम घाट अतुलनीय जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे असणाऱ्या कित्येक प्रजातींचे शोध अजून लागले नसल्याचे पर्यावरण प्रेमी सांगतात. अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, सौनक पाल, ईशान अगरवाल या चार मित्रांनी येथून ‘निमास्पिस’ या कुळातील ‘निमास्पिस मॅग्निफिका’ या पालीच्या नव्या प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध लावला आहे.
हे चार मित्र वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल ‘ठाकरे वाइल्डलाइफ फौंडेशन’, मुंबई आणि ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायनसेस’, बेंगलोर येथे कार्यरत आहेत. तेजस ठाकरे ‘ठाकरे वाइल्डलाइफ फौनडेशन’, मुंबई येथे कार्यरत आहेत. सौनक पाल ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, मुंबई येथे कार्यरत आहेत. ‘ड्वार्फ गेको’ या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून, त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामधून झाली आहे.
यासंदर्भात अक्षय खांडेकर म्हणाले की, २०१४ मध्ये सर्वप्रथम या पाली आम्हाला सकलेशपूर, कर्नाटक येथील उभ्या शिळांमध्ये (दगडांमध्ये) आढळून आल्या. या पालींच्या आकार व रंगावरून आम्हाला ही विज्ञानासाठी नवीन प्रजात असू शकेल, असे वाटले होते. परंतु भारतातील पश्चिम घाटामधून या कुळातील पूर्वी नोंद असलेल्या पालींच्या नमुन्यांअभावी यांचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकला नाही किंवा नवीन असल्याची तपासणी करता आली नाही. जून २०१८ मध्ये आमच्या संशोधकांच्या ‘टीम’ने पश्चिम घाटातील जंगलांमधून या कुळातील वेगवेगळ्या प्रजातींचे नमुने तुलनात्मक अभ्यासासाठी गोळा केले. प्रयोगशाळेतील आकरशास्त्रीय व जनुकीय अभ्यासाअंती आम्हाला असे लक्षात आले की सकलेशपूर येथील पाली या खरोखरच विज्ञानासाठी नवीन आहेत. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये आमच्या टीम ने यासंदर्भातील तपशीलवार शोधनिबंध अंतरराष्ट्रीत्या ख्यातिच्या ‘झूटाक्सा’ या नियतकालिकाला (जर्नल) सादर केला आणि २ महिन्यापूर्वी शोधनिबंधाची पडताळणी केल्यानंतर त्यास मान्यता मिळाली व अखेर हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला.
नवीन प्रजातीचे नाव ‘निमास्पिस मॅग्निफिका’ असे करण्यात आले आहे. ‘मॅग्निफिका’ हे नाव लॅटिन भाषेतील मॅग्निफिको (म्हणजेच इंग्रजी मध्ये मॅग्निफिसंट) असे या पालीच्या मोठ्या आकारावरून व सुंदर रंगावरून देण्यात आले आहे. या पालीचे इंग्रजी नामकरण ‘मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको’ असे करण्यात आले आहे.

पालीच्या प्रजातीबद्दल अधिक माहिती
पालीची ही नवीन जात प्रदेशानिष्ठ असून फक्त पश्चिम घाटातील सकलेशपूर भागात असणाऱ्या दगडांच्या मोठ्या शिळांवरती आढळते. ‘निमास्पिस’ या कुळातील बहुतांश पाली दिनचर असल्या तरी याच कुळातील ही नवीन जातीची पाल मात्र याला अपवाद आहे आणि निशाचर म्हणजेच फक्त रात्री सक्रिय असते. ‘निमास्पिस या कुळातील नोंद असलेल्या आकारानी सर्वाधिक मोठ्या पालींपैकी ही एक प्रजाती आहे व तिची लांबी ५८ मिलिमीटर इतकी आहे.

भारतात ५० प्रजातींची नोंद
भारतात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु या कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात, त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. भारतामध्ये ‘निमास्पिस’ या कुळातील आजवर ५० प्रजातींची नोंद झालेली असून त्या पश्चिम घाट, मैसूर चे पठार, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान आणि निकोबर बेटांवरती आढळतात. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्या नैसर्गिक अन्न साखळीचा महत्त्वाचा भाग आहेत.

 

संबंधित बातम्या