उत्तर प्रदेश पोलिसांचा अजब फंडा; सॅनिटायझर म्हणून दिलं 'गंगाजल'

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 मार्च 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आज मोठ्या खबरदारीसह होळीचा सण साजरा करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आज मोठ्या खबरदारीसह होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसीसह अनेक शहरांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच वेळेस उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील नौचंडी पोलिस स्टेशनचे अधिकारी हे पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्यांना वेगळ्याच प्रकारे होळीच्या शुभेच्छा देत असल्याची माहिती मिळाली आहे. मेरठच्या नौचंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी तक्रार लिहिण्यासाठी आलेल्या लोकांना होळीच्या निमित्ताने गंगाजलची बाटली देत आहेत. (Distribution of Ganga water as sanitizer by Uttar Pradesh Police)

देशात दरवर्षी मोठ्या उत्साहाने होळीचा सण साजरा केला जातो. मात्र यंदाच्या वेळेस कोरोनाच्या संकटामुळे होळीच्या उत्सवावर काही निर्बंध आले आहेत. कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून होळीचा सण साजरा करताना प्रशासनाने देशात नियमावली देखील जाहीर केली आहे. शिवाय प्रशासनाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुद्धा अनिवार्य केले आहे. अशातच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील मेरठच्या नौचंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी हे पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना सॅनिटायझर म्हणून गंगाजल वाटत असल्याचे समोर येत आहे. 

Farmers Protest : संतप्त शेतकरी आंदोलकांचा भाजपा आमदारावर हल्ला 

याबाबत बोलताना, होळीच्या निमित्ताने कोणालाही दारू वैगेरे न देता गंगाजल देण्याचे येथील पोलिसांनी म्हटले आहे. तसेच गंगाजल हे सॅनिटायझर (sanitizer) असून याची सर्वत्र फवारणी देखील करण्याचे आवाहन देखील येथील पोलिसांनी केले आहे. शिवाय गंगाजल हे सॅनिटायझर असल्यामुळेच आपण पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना सर्वांना गंगाजलची बाटली देत असल्याचे येथील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील समोर येत असलेली कोरोनाची आकडेवारी वाढतच चालली आहे. मागील चोवीस तासात देशात 62 हजार 714 कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 312 जणांचा जीव कोरोनामुळे गेला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 झाली आहे. आणि त्याचवेळेस देशात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 552 जणांना कोरोनाच्या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.              

संबंधित बातम्या