सणासुदीत निष्काळजीपणा नको; पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

 देशातील लॉकडाउन संपला, तरी कोरोनाचा विषाणू देशातून गेलेला नाही. त्यामुळे  लस येत नाही तोपर्यंत देशवासीयांनी कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक दिशानिर्देशांचे पालन करताना हयगय करू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.

नवी दिल्ली : देशातील लॉकडाउन संपला, तरी कोरोनाचा विषाणू देशातून गेलेला नाही. त्यामुळे  लस येत नाही तोपर्यंत देशवासीयांनी कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक दिशानिर्देशांचे पालन करताना हयगय करू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.

नवरात्रासह आगामी दसरा, ईद, दिवाळी, छटपूजा, गुरू नानक जयंती हा सणासुदीचा काळ भारतीयांच्या जीवनातही आनंद घेऊन यावा, अशी मी प्रार्थना करतो. आरोग्यविषयक खबरदारी घेताना हयगय करू नका तसेच आपला व इतरांचा सणांचा आनंद हिरावून घेऊ नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी आज सायंकाळी देशाला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्यूपासून आजतागायत भारतवासीयांनी मोठा प्रवास केला आहे. आर्थिक व इतर व्यवहारांत गती येत आहे. लोक जबाबदाऱ्या सांभाळून जीवनाला गती देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठांतही हळूहळू व्यवहार वाढत आहेत. मागील ७-८ महिन्यांत भारताने परिस्थिती जशी सांभाळली त्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. 

भारतातील कोरोना व्यवस्थापन परिस्थिती विकसित देशांपेक्षा चांगली असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, की अमेरिका, स्पेन, ब्राझील, ब्रिटन यासारख्या  संपन्न देशांच्या तुलनेत भारताने जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचविण्यात यश मिळविले आहे. आमच्याकडे रिकव्हरी रेट जास्त आहे व मृत्यूदर कमी आहे. मात्र अजून ही निष्काळजीपणे वागण्याची ही वेळ नाही. कोरोना निघून गेला किंवा आता त्यापासून धोका नाही असे कोणीही मानू नये. अनेक लोकांनी कोरोना दिशानिर्देशांचे पालन करणे थांबविले आहे, मास्क न लावता घराबाहेर पडणे सुरू केले आहे, हे सारेच हे गंभीर आहे. 

संबंधित बातम्या