डीआरडीओने भारतीय नौदलांच्या जहाजांसाठी विकसित केले खास चिलखत 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 5 एप्रिल 2021

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने नौदल जहाजांना शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यापासून वाचवण्यासाठी नवीन चिलखती कवच तयार केले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने नौदल जहाजांना शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या लक्ष्यापासून वाचवण्यासाठी नवीन चिलखती कवच तयार केले आहे. प्रगत चाफ तंत्रज्ञानावर आधारित हे कवच शत्रूंच्या रडारला गोंधळात टाकून, शत्रूने सोडलेल्या क्षेपणास्त्रांची दिशा बदलण्यास मदत करणार आहे. विकसित करण्यात आलेले हे चिलखती कवच स्वावलंबी भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर (डीएलजे) ने हे चिलखत विकसित केले आहे.

डीआरडीओने या कवच तंत्रज्ञानाचे तीन प्रकार तयार केले असल्याचे म्हटले आहे. शॉर्ट रेंज चाफ रॉकेट, मध्यम रेंज चाफ रॉकेट आणि लाँग रेंज चाफ रॉकेट हे तीन प्रकार आहेत. अलीकडेच भारतीय नौदलाने या कवच तंत्रज्ञानाची अरबी समुद्रात चाचणी केली, जिथे हे पूर्णपणे प्रभावी असल्याचे दिसून आले. हे तंत्रज्ञान संरक्षण उद्योगाशी संबंधित कंपन्यांना पुरवले जाणार आहे. जेणेकरून त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. संरक्षण अनुसंधान व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी नौदल जहाजांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असलेले हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

चाफ तंत्रज्ञानाचा वापर जगभरातील जहाजांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा सर्वात पहिल्यांदा वापर दुसऱ्या महायुध्यात करण्यात आला होता. चाफ हे रडार काउंटरमेजर तंत्रज्ञान आहे. या अंतर्गत रॉकेटच्या सहाय्याने भुसकट सामग्रीचा धूर हवेत बनविला जातो. यात अ‍ॅल्युमिनियम, मेटलाइज्ड ग्लास फायबर किंवा प्लास्टिक यांचा वापर करण्यात येतो. हा धूर शत्रूच्या रडारवर लक्ष्याप्रमाणे दिसतो. त्याच्या मदतीने शत्रूची क्षेपणास्त्र सहजपणे भरकटतात. दरम्यान, या प्रगत तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हवेतील थोडासा भुसकट पदार्थ देखील शत्रूच्या क्षेपणास्त्राला दुसरीकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसे असल्याचे डीआरडीओने सांगितले आहे. 

संबंधित बातम्या