कोरोना लशीच्या वितरणापूर्वी 2 जानेवारीला सर्वच राज्यांमध्ये पुन्हा रंगीत तालीम

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ जानेवारीला देशातील सर्वच राज्यांमध्ये हे ड्राय रन होणार आहे. सर्वच राज्यांतील काही ठराविक स्थळे निवडून तेथे निर्धारित समयी ही लस पोहचवली जाणार आहे. याआधी 28 आणि 29 डिसेंबर रोजी या ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. 

नवी दिल्ली- कोरोना लशीच्या वितरणापूर्वी २ जानेवारी रोजी देशातील सर्वच राज्यांत लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २ जानेवारीला देशातील सर्वच राज्यांमध्ये हे ड्राय रन होणार आहे. सर्वच राज्यांतील काही ठराविक स्थळे निवडून तेथे निर्धारित समयी ही लस पोहचवली जाणार आहे. याआधी 28 आणि 29 डिसेंबर रोजी या ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. 

केंद्र सरकारने याआधीच देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना कोविडच्या लशीसाठी तयार राहण्याविषयी सूचना दिल्या आहेत. आरोग्य सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांबरोबर एक उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या मदतीने आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणासाठी करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावाही या बैठकीत घेतला. 

जानेवारी २०२१मध्ये देशातील सर्वच राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील किमान ३ स्थळांवर या लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. काही राज्य हे ड्राय रन काही दुर्गम जिल्ह्यांमध्य़ेही राबवू शकतात. विशेषत: महाराष्ट्र आणि केरळ ही राज्ये आपल्या राजधानीव्यतिरिक्त दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये राबवू शकतात. खऱ्या लशीच्या वितरणात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे ड्राय रन घेण्यात येत असून लसीकरण कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले co-WIN अॅप्लीकेशन लसीकरणाच्यावेळी कसे काम करेल याचे निरीक्षण करून त्याची नोंद ठेवली जाणार आहे.  

या लसीकरणादरम्यान प्रत्येक सेशन साइटसाठी संबंधित आरोग्य अधिकारी तसेच ज्यांना लस टोचण्यात येणार आहे ते २५ आरोग्य कर्मचारी आदिंची ओळख परेड होणार आहे. या लाभार्थ्यांची माहिती co-WIN मध्ये अपलोड करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. ड्राय रनसाठी सु्द्धा संबंधित  लाभार्थ्यांना उपस्थित रहावे लागणार आहे.
   
दरम्यान, पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आलेल्या लशीलाही आपत्कालीन लस म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून गुरूवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल डॉ. सोमानी यांनी एका वेबिनारमध्ये तसे संकेत दिले आहेत. नवीन वर्षात आपले हात रिकामे नसतील अशी आशा असल्याचे ते म्हणाले होते.  

 

संबंधित बातम्या