‘डीटीसी’ पूर्ण क्षमतेने धावणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

दिल्ली परिवहन सेवेच्या (डीटीसी) क्‍लस्टर व वातानुकूलित बसमध्ये कोरोना काळात दोन आसनी जागेवर एकाच प्रवाशाला बसविण्याचा म्हणजे ५५ आसनी बसमध्ये २० ते २२ प्रवाशांनाच घेऊन जाण्याचा नियम आता रद्द करण्यात आला.

नवी दिल्ली : दिल्ली परिवहन सेवेच्या (डीटीसी) क्‍लस्टर व वातानुकूलित बसमध्ये कोरोना काळात दोन आसनी जागेवर एकाच प्रवाशाला बसविण्याचा म्हणजे ५५ आसनी बसमध्ये २० ते २२ प्रवाशांनाच घेऊन जाण्याचा नियम आता रद्द करण्यात आला. यामुळे पुढील आठवड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसविण्याची अट रद्द करून दोन आसनांवर दोन प्रवाशांना बसता येईल. यानुसार संपूर्ण क्षमतेने बस धावण्याबाबतचा आदेश नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिला. 

दिल्लीत बसने प्रवास करणाऱ्या लक्षावधी सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सणासुदीच्या दिवसांत तरी कमी होण्याची आशा असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या दिल्लीत पुन्हा वेगाने वाढू लागल्याने बस प्रवाशांना स्वतःच स्वतःची जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचा इशारा सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी दिला आहे. दरम्यान, बैजल यांनी दिल्लीतून आंतरराज्य प्रवासी बस सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. यामुळे चंडीगड, सिमला, मथुरा, लखनौ आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधा होणार आहे. मंडी हाऊसपासून सिमल्याला जाणारी बससेवा सुरू करण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारचे किमान तीन प्रस्ताव यापूर्वी दिल्ली सरकारने फेटाळले होते. कोरोना काळात दिल्ली सरकारने डीटीसी बसेस सुरू केल्या. मात्र प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसविण्याची अट टाकली. 

संबंधित बातम्या