डॉ. सिंग यांच्या काळात मोठा भूभाग चीनच्या घशात

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

भाजपचा माजी पंतप्रधानांवर उलटवार

नवी दिल्ली

चीनबरोबरच्या ताज्या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दिलेला सल्ला सत्तारूढ भाजपला रुचलेला नाही. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी डॉ. सिंग यांच्यावर उलटवार करताना म्हटले, की ज्यांच्या सरकारांच्या काळात चीनने भारताचा तब्बल ४३ हजार किलोमीटर भूभाग घशात घातला, त्याच पक्षाचे (काँग्रेस) नेते असलेले डॉ. सिंग ताज्या संघर्षाबाबत बोलत आहेत.
पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीत चीनच्या घुसखोरीबद्दल केलेले विधान, त्यानंतर पंतप्रधान कार्यालयापासून वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी केलेले खुलाशांवर खुलासे, या पार्श्‍वभूमीवर चीनबाबत मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्‍न विचारणारा प्रत्येक जण सैन्याचा अपमान करत आहे, अशी भूमिका घेण्यास भाजपच्या तमाम नेत्या-प्रवक्‍त्यांनी सुरुवात केली आहे. लडाखबाबत डॉ. सिंग यांनी मोदी यांना काही सल्ले दिले. मात्र, त्यामुळे विशेषतः त्यांच्या अखेरच्या ‘ऐतिहासक विश्‍वासघात’ या शब्दयोजनेमुळे भाजप नेते खवळले असून, नड्डा यांनी लगेचच सिंग यांचे पत्र म्हणजे निव्वळ शब्दांचा खेळ असल्याचे टीकास्त्र सोडले. नड्डा यांनी म्हटले, की ‘प्रिय डॉ. सिंग व काँग्रेस पक्षाने आमच्या शूरवीरांच्या सामर्थ्यावर सतत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून भारतीय लष्कराचा अपमान करणे बंद केले पाहिजे. काँग्रेसने हेच प्रकार पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइक व हवाई हल्ल्यांवेळीही केले होते. अशा आव्हानकाळात तरी या पक्षाने राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ समजून घेऊन आपले वर्तन सुधारावे.’
डॉ. मनमोहनसिंग अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडू शकतात; पण पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी त्यांच्यावर नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असाही हल्ला नड्डा यांनी चढविला आहे. २०१० ते २०१३ या काळात चीनने ६०० वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचेही नड्डा यांनी म्हटले.

संबंधित बातम्या