स्वायत्ततेचा सन्मान व्हावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

प्रत्येक देशाने दुसऱ्यांच्या भौगोलिक अखंडत्वाचा आणि सार्वभौमत्वाचा आदर राखावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शांघाय सहकार्य परिषदेत (एससीओ) केले.

नवी दिल्ली : प्रत्येक देशाने दुसऱ्यांच्या भौगोलिक अखंडत्वाचा आणि सार्वभौमत्वाचा आदर राखावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शांघाय सहकार्य परिषदेत (एससीओ) केले. चीनला असा इशारा देतानाच मोदी यांनी सदस्य देशांमध्ये मजबूत संपर्क यंत्रणा निर्माण होण्याची अपेक्षाही व्यक्त केली. 

रशियाच्या अध्यक्षतेखाली यंदा प्रथमच ‘एससीओ’ची परिषद आभासी पद्धतीने झाली. या परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेदेखील उपस्थित होते. परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की,‘सदस्य देशांमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत, संपर्क यंत्रणा निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने दुसऱ्यांच्या भौगोलिक अखंडत्वाचा आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे आवश्‍यक आहे.’

शेजारच्यांशी संबंध चांगले हवेत : जिनपिंग 
जगभरात कोरोना संसर्गाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याबद्दल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, या मुद्याचे राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. शेजारील देशांनी चांगले संबंध ठेवताना एकमेकांना कोंडीत पकडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सीमा रेषांचा आणि नागरिकांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आदर ठेवला जावा, अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या