पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संस्थेवर ‘ईडी’चे छापे

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेवर कारवाई करताना नऊ राज्यांतील या संस्थेच्या २६ कार्यालयांवर छापे घातले.

नवी दिल्ली:  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेवर कारवाई करताना नऊ राज्यांतील या संस्थेच्या २६ कार्यालयांवर छापे घातले. या कारवाईमध्ये संस्थेचे अध्यक्ष ओ. एम. अब्दुल सलाम आणि केरळचे अध्यक्ष नसिरुद्दीन एलामारोम यांच्या कार्यालयांचीही झडती घेण्यात आली. आर्थिक हेराफेरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती तपास संस्थेच्या  अधिकाऱ्यांनी दिली.

तमिळनाडू, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, प.बंगाल, राजस्थान, दिल्ली आणि केरळमधील मल्लपुरम आणि तिरूअनंतपुरम या ठिकाणांवरील संस्थेच्या कार्यालयांवर छापे घालण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक हेराफेरी होत असल्याचा संशय तपास संस्थेला होता. या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी ही तपास मोहीम राबविण्यात आली.

आंदोलनास चिथावणी
नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनला पीएफआयनेच चिथावणी दिल्याचा संशय तपाससंस्थेला असून दिल्लीत फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेली दंगल आणि देशाच्या अन्य भागांतील हिंसक आंदोलनप्रकरणी ही संस्था ‘ईडी’च्या रडारवर होती.

केरळमध्ये २००६ मध्ये ‘पीएफआय’ची स्थापना झाली होती, या संस्थेचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. भीम आर्मीला अर्थपुरवठा करण्यामध्येही या संस्थेचा मोठा वाटा असल्याचा संशय तपास संस्थेला आहे. आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहोत असे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले.

आंदोलनावरून देशाचे लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. ‘ईडी’चा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात आहे.
- ओ. एम. अब्दुल सलाम, अध्यक्ष

औरंगाबादेतील कार्यालयावर ईडीचा छापा
औरंगाबाद कैसर कॉलनी परिसरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी छापा टाकला. छाप्यादरम्यान संस्थेच्या जिल्हा समिती पदाधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याची माहिती पसरताच शेकडो तरुणांचा जमाव कार्यालयासमोर जमला. यावेळी मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे बायजीपुरा ते रोशनगेट परिसरात बंदोबस्त तैनात केला. 

माजी जिल्हाध्यक्षास ताब्यात घेतले
कैसर कॉलनी, बायजीपुऱ्यातील कार्यालयात ईडीचे चार ते पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. पथकाने कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पॉप्युलर फ्रंटकडून देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांना आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे का? याची पडताळणी करण्याचा भाग म्हणून ही छापेमारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या