'रिपब्लिक भारत'च्या अर्णब गोस्वामीला अटक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. 

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली. पोलिसांकडे कोणतीही न्यायालयीन कागदपत्रं, कोर्टाचा आदेश नसताना ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिक चॅनल कडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांना घेऊन पोलीस अलिबागला रवाना झाले आहेत.

 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याच सांगण्यात यात आहे.  अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी  अलिबाग येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्न निर्माण केला आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आलं असही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना ही अटक झाल्याचा दावा आहे.

अर्णब गोस्वांमी यांच्या घरात  १० पोलीस कर्मचारी घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.

संबंधित बातम्या