सीबीएसईचा इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम केला जाहीर

pib
बुधवार, 8 जुलै 2020

आज जाहीर करण्यात आलेला सुधारित अभ्यासक्रम सीबीएसईच्या शैक्षणिक संकेतस्थळावर  www.cbseacademic.nic.in  उपलब्ध आहे.

नवी दिल्ली,

संपूर्ण जगभरामध्ये आणि देशातही कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला 2020-2021च्या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यासक्रम थोडा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार आज मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सीबीएसईचा इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम जाहीर  केला.

काही आठवड्यापूर्वीच सर्व शिक्षण तज्ज्ञांना अभ्यासक्रम कमी करण्याविषयी सूचना करण्याचे आवाहन समाज माध्यमांद्वारे करण्यात आले होते. अभ्यासक्रमाविषयी ‘हॅशटॅगसिलॅबसफॉरस्टुटंड 2020’ यावर 1.5 हजारांपेक्षा जास्त सूचना आल्याची माहिती निशंक यांनी यावेळी दिली. मंत्रालयाच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. आलेल्या सूचनांचा विचार करून प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी नियुक्त केलेली समिती आणि मंडळाच्या प्रशासकीय मान्यतेनंतर आता सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शिक्षणाचा विशिष्ट स्तर-दर्जा कायम राहावा, हे लक्षात घेवून मुलांना मूलभूत संकल्पना शिकवणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. त्यामुळे शक्य तितकाच अभ्यासक्रम कमी करून तर्कसंगत केला आहे, असे निशंक यांनी सांगितले.

अभ्यासक्रमातून जी प्रकरणे वगळण्यात आली आहेत, त्याची परीक्षा घेण्यात येणार नसली तरीही मुलांना शक्य असेल तेंव्हा ती प्रकरणे समजावून सांगावीत, असा सल्ला सर्व शाळांच्या प्रमुखांना आणि शिक्षकांना देण्यात आला आहे. कारण पुढच्या शिक्षणामध्ये त्या प्रकरणांविषयी प्राथमिक माहिती मुलांना असणे गरजेचे असते. तथापि कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचे अंतर्गत मूल्यांकन किंवा वर्षाखेरीस होणा-या बोर्डाच्या परीक्षेसाठी विचार करण्यात येणार नाही. पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका आणि एनसीईआरटीच्या वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतींचा वापर करून अध्यापनशास्त्रानुसार शिकवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्राथमिक वर्ग चालवणाऱ्या (इयत्ता पहिली ते आठवी) शाळांनी एनसीईआरटीने निर्दीष्ट केलेल्या वैकल्पिक शैक्षणिक दैनंदिनी आणि शैक्षणिक परीक्षण पद्धतीनुसार कार्य करावे, असे सुचविण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या