ममता बॅनर्जी यांचे आरोप तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे - निवडणूक आयोग  

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

देशातील चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. यातील काही राज्यांमध्ये निवडणुकांचे पहिले काही टप्पे पार पडलेले आहेत.

देशातील चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. यातील काही राज्यांमध्ये निवडणुकांचे पहिले काही टप्पे पार पडलेले आहेत. पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीत नंदिग्राममधील मतदान केंद्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तनामुळे त्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या मतदान केंद्रावर मतदानात व्यत्यय आणल्याचा आरोप फेटाळून लावल्याचे समजते. याशिवाय, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या तक्रारीवर बोलताना तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. 

तसेच, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या मतदान केंद्रावरील वर्तनाचा पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी नंदीग्राममध्ये मतदानाच्या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजप आणि तृणमूल समर्थकांमध्ये झालेल्या तणावात अडकल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांना सुमारे दोन तास एका खोलीत थांबावे लागले होते. यानंतर काही वेळाने ममता बॅनर्जी यांना सुरक्षा दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले होते. 

‘’नंदीग्रामची निवड ममतांची सर्वात मोठी चूक’’

या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग हा भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेचे पालन करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत एकूण 63 तक्रारी दाखल केल्या असल्याचे सांगत, निवडणूक आयोगाने यावर दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले. इतकेच नाही तर, मतदान केंद्राच्या बाहेर व्हीलचेयरवर बसून ममता बॅनर्जी यांनी, आपल्याला हे मान्य नसल्याचे नमूद करत, आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले होते. 

शिवाय, ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळावरून बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांना कॉल करत परिस्थितीची माहिती दिली होती. तसेच ही परिस्थिती निवडणूक आयोगाच्या कायदा व सुव्यवस्थेमुळे हाताळली जाऊ शकली नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड़ यांना सांगितले होते.        

संबंधित बातम्या