ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत प्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीसंदर्भात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीसंदर्भात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. पूरबा मेदिनीपुरचे डीएम विभू गोयल यांची बदली करण्यात आली आहे. तर एसपी प्रवीण प्रकाश यांचे निलंबन करण्यात आले आहे. विवेक सहाय यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करत, झेड प्लसच्या सुरक्षेसाठी सुरक्षा संचालक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल एका आठवड्यात त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात यावेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

याशिवाय, निवडणूक आयोगाने पूरबा मेदिनीपुर मध्ये विभू गोयल यांच्या जागी आयएएस अधिकारी स्मिता पांडे यांची डीएम आणि डीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. तर गोयल यांची बदली विना निवडणुकीच्या ठिकाणी करण्यात आली आहे. यानंतर, एसपी प्रवीण प्रकाश यांना निलंबित करताना आयोगाने कठोर आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने सुरक्षितेत अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात यावेत असे म्हटले आहे. आणि बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पंजाबचे इंटेलिजन्सचे माजी डीजीपी अनिल कुमार शर्मा यांची विशेष पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विवके दुबे यांच्याव्यतिरिक्त ए के शर्मा हे दुसरे विशेष पोलिस निरीक्षक राहणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

Assam Election : ''आगामी पाच वर्षात आसामला घुसखोरीपासून मुक्त करू...

याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याने त्या जखमी झाल्याचे निवडणूक आयोगाने नाकारले आहे. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. आयोगाने दोन विशेष निवडणूक निरीक्षक आणि राज्य सरकारच्या अहवालांचा आढावा घेतल्यावर सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

तसेच, ममता बॅनर्जी या स्टार प्रचारक असूनही त्या बुलेट प्रूफ किंवा चिलखती वाहन वापरत नसल्याने ही गोष्ट त्यांच्या सुरक्षेस जबाबदार असणाऱ्यांची चूक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान खाली पडल्या होत्या आणि त्यांच्या डाव्या पायाला व  पाठीला दुखापत झाली होती. या घटनेनंतर अज्ञात लोकांनी ममता बॅनर्जी यांना ढकलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. तर ममता बॅनर्जी यांनी उपचार घेऊन पुन्हा व्हीलचेअरवरून प्रचाराला सुरवात केल्याचे आज पाहायला मिळाले होते.    

 

संबंधित बातम्या