शतकाअखेरीस लोकसंख्येचे प्रमाण बदलणार

PTI
शुक्रवार, 17 जुलै 2020

संशोधकांचा निष्कर्ष ; भारताची लोकसंख्या दीड अब्जांपर्यंत जाण्याचा अंदाज

नवी दिल्ली

भारताची लोकसंख्या अजून २८ वर्षांनी एक अब्ज ६० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तसेच, इसवी सन २१०० पर्यंत देशाच्या लोकसंख्येत ३२ टक्क्यांनी घट होऊन ती एक अब्ज ९ लाखांपर्यंत खाली येईल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही घट झाली तरी त्यावेळी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल.
'लॅन्सेट' या नियतकालिकात याबाबतचे विश्लेषण प्रसिद्ध झाले असून त्यात भारत, चीन आणि जपानसह १९५ देशांच्या लोकसंख्या, मृत्युदर, जन्मदर आणि स्थलांतराचा वेग याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठासह इतर काही नामवंत संशोधन संस्थांमधील संशोधकांनी मिळून ही माहिती आणि विश्लेषण तयार केले आहे. आणखी तीस वर्षांनंतर जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात मोठे बदल अपेक्षित असून आर्थिक सत्ताकेंद्रेही बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संशोधकांचे भारताबाबतचे अंदाज...
- भारत आणि चीनमधील रोजगारक्षम लोकसंख्या कमी होऊन त्याचा त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम शक्य
- शतकाअखेरीस जग बहुकेंद्री बनून भारत, नायजेरिया, चीन आणि अमेरिका हे प्रमुख बलवान देश बनतील
- २०१७ मध्ये भारताची रोजगारक्षम वयातील लोकांची संख्या ७६ कोटी २० लाख होती, ती शतकाअखेरीस कमी होऊन ५७ कोटी ८० लाख असेल. चीनच्या बाबतीत हीच लोकसंख्या ९५ कोटींवरून ३५ कोटी ७० लाखापर्यंत खाली येईल.
- आशियामध्ये भारत एकमेव ताकद असेल.

इतर काही अंदाज
- अमेरिकेची लोकसंख्या २०६२ पर्यंत वाढत जाऊन नंतर ती कमी होत जाईल
- स्थलांतर कायम राहिल्याने अमेरिकेत रोजगारक्षम लोकसंख्येचे प्रमाण टिकून राहील
- जन्मदर वेगाने घटणार

इ. स. २१०० मधील जगाचे अंदाजित चित्र
- २.३७ अब्ज : ६५ वर्षांवरील लोकांची संख्या
- १.७ अब्ज : २० हून कमी वय असलेल्यांची संख्या
- १.६६ : प्रत्येक महिलेमागे अपत्यांचे प्रमाण (सध्या २.३७)

या संशोधनामुळे विविध देशांना स्थलांतर, आर्थिक विकास आणि कामगार धोरण याबाबत फेरआढावा घेऊन दीर्घकालीन योजना तयार करण्याची संधी मिळाली आहे.
- ख्रिस्तोफर मरे, संशोधक

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या