नक्की किती लोक कोरोनामुक्त?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

हर्षवर्धन सांगतात ३५ लाख, सचिव म्हणतात ३९ लाख! 

नवी दिल्ली: कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३५ लाख ४२ हजार ६६३ असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत सांगितले. मात्र त्यानंतर जेमतेम ५ तासांनी त्यांच्याच मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी हा आकडा ३९ लाख असल्याचे सांगितले. भारतात इतक्‍या कमी काळात ४ ते ५ लाख रूग्ण बरे होत असतील तर साऱ्या जगानेच हे ‘इंडिया कोरोना मॉडेल’ अंगीकारायला हवे अशी चर्चा त्यामुळे रंगली. 

राज्यसभेत हर्षवर्धन म्हणाले की, देशातील रूग्णसंख्या ४५ लाख ६२ हजार ४१४ आहे. त्यातील ९२ टक्के लोकांना अगदी सौम्य लक्षणे आहेत. केवळ ५.८ टक्के लोकांनाच ऑक्सि‍जन उपचारांची गरज लागली असून केवळ १.७ टक्के रूग्ण अतिदक्षता विभागात आहेत. मृतांची संख्या ७६,२७१ आहे. केंद्राने वेळेवर लॉकडाऊन लावल्यामुळे अंदाजे १४ ते २९ लाख रूग्णसंख्या कमी झाली व तब्बल ३८ हजार लोकांचे जीव वाचविता आले. आतापावेतो एकूण रूग्णांच्या ७७.६५ टक्के म्हणजे ३५,४२,६६३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मुख्यत: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ,कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, तेलंगण, ओडिशा, आसाम, केरळ आणि गुजरातमधूनच सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.

हर्षवर्धन यांच्या निवेदनानंतर आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी माहिती देताना, देशात ३८ लाख ५० हजारांहून जास्त लोक बरे झाले आहेत. आज संपलेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ४०९ लोक दगावल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या