Bihar elections: एक्झिट पोलने म्हटले ते झालेच नाही...

Bihar elections: एक्झिट पोलने म्हटले ते झालेच नाही...
exit polls

पाटणा- मागील महिन्यापासून तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर अनेक राजकीय विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांनी तसेच विविध संस्था आणि वाहिन्यांनी कल दिले होते. हे कल आता खोटे ठरताना दिसून येत आहेत. एनडीएने बहुमतापेक्षा जास्त आघाडी घेतल्याने राजद सत्ता स्थापन करू शकेल असे भाकित वर्तवणाऱ्या अनेक वाहिन्यांचे अंदाज खोटे ठरलेले असल्याचे चित्र आहे. 

 बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीत दुपारपर्यंतच्या कलांनुसार अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. मतमोजणीला सुरूवात झाल्यावर राजद आणि कॉंग्रेस यांचे महागठबंधन बऱ्याच जागी पुढे होते. वाहिन्यांनी वर्तविलेल्या भाकितानुसार त्यांना कदाचित आज पूर्ण बहुमत मिळेल अशी आशा होती. मात्र, एनडीएने जोरदार मुसंडी मारत आता स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. ताज्या निवडणूक मतमोजणीनुसार, राजद ६३ तर कॉंग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे ७६ उमेदवार आता आघाडीवर दिसून येत असून मित्रपक्ष जदयूचे ५० उमेदवार आघाडीवर आहेत. लोकजनशक्ती पक्षही ३ जागांवर आघाडीवर आहे.

आपली शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन नितीश कुमार यांनी प्रचारादरम्यान केले होते. तर रोजगाराच्या नावावर तेजस्वी आपली निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत १ कोटी मतदारांची मतमोजणी झाली असून अजूनही ३ कोटी मतदारांचा कल स्पष्ट व्हायचा आहे. 
 

 काही प्रमुख माध्यम संस्थांचे एक्झिट पोल-  

  • इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यांनी ४४ टक्के,  नितीश कुमार यांना ३५ टक्के तर चिराग पासवान यांना ७  टक्के लोकांनी पसंत केले आहे.
  • टाईम्स नाऊच्या एक्झिट  पोलमध्ये एनडीएला ११६ जागा मिळतील असे सांगितले आहे. याचवेळी महागठबंधनला १२० जागा मिळतील असेही म्हटले आहे. लोकजनशक्ती पक्षाची एकही जागा येणार नसल्याचेही या पोलचा रिपोर्ट सांगतो. 
  • रिपब्लिक टीव्हीने केलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ९१ ते ११७ जागा मिळतील. गठबंधन यात निर्णायक आघाडीवर असून तेथे त्यांची ११८ ते १३८ जागांपर्यंत मजल जावू शकते. लोकजनशक्ती पक्षाला यात ५ ते ८ जागा मिळाल्या आहेत. 

  सद्यस्थितीत बिहारमध्ये चित्र एक्झिट पोलच्या बरोबर विरूद्ध दिसत असून रात्री उशिरापर्यंत निवडणूक निकाल लागल्यावरच सर्व २४३ जागांवरील उमेदवारांचे भविष्य काय आहे ते कळू शकेल.          

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com