काँग्रेसची मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे धाव

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

महत्प्रत्सायाने मिळवलेल्या लोकशाहीमध्ये आपण एकतर्फी, खोट्या बातम्या आणि द्वेषभावना भडकावणारी भाषणे यांची ढवळाढवळ सहन करू शकत नाही. वॉल स्ट्रीट जर्नलने उघडकीस आणलेला, खोट्या आणि द्वेष वाढविणाऱ्या बातम्यांच्या प्रसारामध्ये फेसबुकचा असलेला सहभाग यावर सर्व भारतीयांनी जाब विचारण्याची आवश्यकता आहे. - राहुल गांधी, नेते काँग्रेस

उच्चस्तरीय चौकशीची मागणी, वरिष्ठ नेते वेणुगोपाल यांचे पत्र

नवी दिल्ली: फेसबुकवरील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित नियंत्रणाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला आहे. कॉंग्रेसने थेट फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे तसेच चौकशीत अडथळे येऊ नये यासाठी भारतातील फेसबुकच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे सोपवावी, असा सल्लाही दिला आहे.

काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) चौकशीची मागणी केली असतानाच फेसबुकच्या माध्यमातून देखील या घटनाक्रमाची चौकशी व्हावी असा आग्रह धरणारे पत्र पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांना पाठवले. फेसबुकच्या खुलाशावर काँग्रेसचे समाधान झाले नसल्याने फेसबुक मुख्यालयानेच कालबद्ध उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये फेसबुकच्या भारतातील प्रमुख श्रीमती दास यांनी भाजपला झुकते माप दिल्याचाही ठपका वेणुगोपाल यांनी ठेवला.  

थरूर यांना भाजपचा विरोध
 संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी तपासासाठी घेतलेल्या पुढाकारवरूनही राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. संसदीय समिती फेसबुककडे विचारणा करणार असल्याचे थरूर यांनी म्हटले होते. त्यावर समितीचे सदस्य निशिकांत दुबे यांनी आक्षेप घेतला. थरूर यांच्या कार्यपद्धतीला आव्हान देत चौकशीचे अधिकार लोकसभाध्यक्षांना आहेत.

फेसबुकच्या अधिकाऱ्याविरोधात एफआयआर
रायपूरः धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फेसबुकच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दोन युजर्संविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील अंखी दास, मुंगेली (छत्तीसगडमधील) राम साहू आणि इंदूर (मध्यप्रदेश) येथील विवेक सिन्हा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चौकशी सुरू असून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले. अंखी दास या भारताच्या जनधोरण विषयक विभागाच्या भारत आणि दक्षिण तसेच मध्य आशिया विभागाच्या संचालक आहेत.

राजासिंह यांच्याकडून इन्कार
हैदराबादः फेसबुकवर व्हायरस झालेल्या द्वेषमूलक भाषणामुळे चर्चेचा विषय ठरलेले हैदराबादेतील भाजपचे आमदार राजासिंह यांनी मात्र त्यांच्यावरील आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. आपण केवळ देशाच्या हितासाठीच काम करतो त्यामुळे अशा प्रकारचे विधान करण्याचा प्रश्‍नच येत नाही असे राजासिंह यांनी म्हटले आहे. आपले फेसबुक पेज हे २०१८ मध्येच ब्लॉक करण्यात आले असून याबाबत आपण पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली होती पण त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे राजा  सिंह यांनी म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या