दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आज उपोषण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आज एक दिवसाचे उपोषण करणार आहेत.

नवी दिल्ली :  नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आज एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. या आंदोलनात आज दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा महामार्गांवर काही काळ ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांचे नेते आणि सरकार यांच्यातील पुढच्या फेरीची चर्चा पुढच्या एक-दोन दिवसात होईल असे संकेत मिळाले आहेत. खात्रीलायक सूत्रांनी ‘सकाळ’ला दिलेल्या माहितीनुसार शेतकरी संघटनांचे नेते एम. एस. पी. आणि बाजार समित्यांवरील कायदा दुरुस्त्या याबाबत ठाम आहेत आणि या दुरुस्त्या संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच करण्याचे आश्वासन सरकारकडून दिले जाऊ शकते. शेतकरी आंदोलकांनी आज दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले. त्यामुळे काही काळ या भागातील वाहतूक विस्कळित झाली होती. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विविध भागात बंदोबस्त कडेकोट केला आहे. 

जामियातील विद्यार्थ्यांना परत पाठविले

शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाला शेतकऱ्यांनी अडविले. दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर हे विद्यार्थी पोहोचले होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला. यामुळे वाद होऊन काही काळ वातावरण तणावाचे झाले होते. यानंतर विद्यार्थी दिल्लीला निघून गेले.

‘डीआयजीं’चा राजीनामा

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आपली पदके आणि पुरस्कार करणाऱ्या मान्यवरांना सोबतच आता सेवेतील अधिकाऱ्यांनी ही सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. पंजाबचे डीआयजी (तुरुंग) लखमिंदर सिंह जाखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.

संबंधित बातम्या